या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Saturday, 21 November 2015

एक कविता...(आसवांनी नाव पुसलेली...)


आजकाल माझं हृदय
सैरावैरा धावत असतं
वाट चुकलेल्या
कोकरासारखं...
भटकत राहतं
कावरंबावरं होऊन
माझ्याच धमन्यांमधून...
शोधत राहतं तुला
आणि तुझ्या 
विखुरलेल्या आठवणींना...
आणि तू
टपकत राहतेस
पापण्यांच्या कडांमधून
आठवांच्या उशीवर...
रात्रभर ...रात्रभर ...

माझ्याच देहातला
हा लपंडाव
मी तटस्थपणे पाहतोय
देहभान विसरुन...
ना वणवा ना ठिणगी
तरीही धुमसतोय बर्फ
आतल्या आत...खोलवर..
तीच धग
वर येऊ पाहतेय
वितळवू पाहतेय
माझी स्थितप्रज्ञता
एका नवीन प्रवाहाला
जन्म देण्यासाठी...
त्याच प्रवाहात
तू टपकत राहतेस
पापण्यांच्या कडांमधून
रात्रभर ...रात्रभर ...

अस्ताव्यस्त पडलेत
मनाचे तुकडे
देहभर...घरभर
आणि आठवांच्या अंगणात ...
अंधारात चाचपडताना
टचकन घुसतो
एखादा तुकडा 
आशावादी हातात
खोलवर...
आणि वाट करुन देतो
थिजलेल्या रक्ताला
पुन्हा वाहण्यासाठी...
त्याच रक्तात
तू टपकत राहतेस
पापण्यांच्या कडांमधून
रात्रभर ...रात्रभर ...

माझे अणुरेणू
बंड करतात आजकाल...
माझ्या तथाकथित 
सोशिकतेच्या विरोधात...
उसळतात
पेटून उठतात
देहभर...मनभर
आणि करु पाहतात सामील
मेंदूलाही..त्यांच्या बंडात...
शेवटी शांत होण्याचा 
अभिनय करतात...
खोट्याच आश्वासनावर
विश्वास ठेऊन...
विझवतात आग
आठवांच्या ओलाव्याने...
आणि तूही टपकत राहतेस
त्याच ओलाव्यासह
पापण्यांच्या कडांमधून
रात्रभर ...दिवसभर...
आणि रात्रभर .........

....डॉ. शिवाजी काळे.

Thursday, 1 October 2015

कविता

अस्तित्व

अस्तित्व शोधता शोधता
ठेचाळले उंबर्याला
वाहणारी जखम
भिडली काळजाला
काळजातून मस्तकात
पुन्हा वहात राहिली
दुनिया बदलताना
उघड्या डोळ्यांनी पाहिली
ठिकर्या ह्रदयाच्या
वेचत राहिले
पुन्हा नव्याने
स्वप्न पाहिले
आता आवाका
बराच मोठा होता
स्वप्नांना माझ्या
जिवलगांचा रेटा होता
काजळल्या कालची
सावलीही होती सोबत
पण अंधारल्या वाटेवर
कंदिलाची आहे संगत
    संध्या

Tuesday, 1 September 2015

कविता

आज असे का झाले.....?

परातीतील पिठाचा
ऊंडा करताना
तिच्या विचारांचे
वारू अगदीच
स्वैर न् बेफाम
धावू लागले
आज असे का झाले......?
मोत्यासारखी ज्वारी
पण पीठ जाडसर
कसे होईल एकजीव
कौशल्याने थापली
पटकन भाकरी
पण गोलाकार होईना
आज असे का झाले......?
तव्यावर चढली
पाणी फिरवताच
ऐटीत हासली
खरपूस भाजताना
भडकत्या ज्वालांनी
बरीच डागाळली
आज असे का झाले......?
रोजच्या सारखी
टूमटूमीत फूगेना
सगळा पापूद्रा
सूटता सूटेना
आता हीचा
कसा बसवावा मेळ
आज असे का झाले......?
आपले आयुष्यही
असेच नियतीसह
भरडले जाणारे
कधी आकारच
न घेऊ पाहणारे
अन् म्हणणारे
आज असे का झाले......?
उन्मादाच्या ज्वालांत
कधी डागाळणारे
गत जीवनाच्या
पापूद्रयांबरोबरच
पूढे जाणारे
अन् विचार करणारे
आज असे का झाले......?
आज असे का झाले......?

----- डॉ माधुरी -----

अंगाई गीत

अंगाई गीत...

ये गं ये गं नीजू बाई
बाळाच्या पापण्या
गोंजारुन जाई..... ||धृ||

गोठयात झोपल्या
वासरे गाई
थकला जीव
शांत होई
झोपेत त्यांना
पान्हा येई .... ||१||

हिरव्या झाडी
पाने निजली
कळी गोजिरी
स्वप्नांत हासली
हासता हासता
गाणे गाई..... ||२||

काऊ- चिऊ
सारी थकली
राघू मैनाही
गाढ निजली
घरटी त्या
ऊब येई.....||३||

डोळ्यांची पाखरे
थकली ना
आज झोप
का येई ना
जागेपणी भारी
अवखळ बाई......||४||

गालावर खळी
हसऱ्या नयनी
परीताई भेटेन
मिटल्या पापणी
परीताई सवे
खेळूनी येई......||५ ||

ये गं ये गं नीजूबाई
बाळाच्या पापण्या
गोंजारून जाई.......

----- डॉ माधुरी -----

Friday, 21 August 2015

नवयज्ञ

लुप्तक्षणांचे मी मंथन करीतो
उद्विग्न होऊनी सयतटावरी
कृष्णबाहुल्यांचा नाच तो बघतो
स्वपराभवाच्या भयपटावरी

मम अंतरीच्या मंथनामधूनी
प्राप्तरत्नांचे मी पूजन करीतो
विगतकालाच्या समिधा अर्पूनी
नवयज्ञाचे मी सृजन करीतो

भाव्यसमराचा शंख निनादतो
आव्हान मिळता मम अस्तित्वाला
औदासिन्याची मी आहुतीच देतो
प्रज्वल करुनी त्या उज्वल ज्वाला

विजितस्वप्नांचे अमृत प्राशूनी
या अश्वमेधाचा अश्व उधळतो
तावूनी निघता अग्निदिव्यातूनी
भविष्यकाळाचे विश्व उजळतो

मम अतिताच्या प्राक्तनास मी
पायदळी छिन्न तुडविल्यावरी
पुनःश्च आतुर आरुढण्यास मी
दुभंगित माझ्या स्वप्नकड्यावरी

   ...डॉ. शिवाजी काळे.

Sunday, 21 June 2015

वर्षापंचम

शुष्कपीत  तृणपात्यांवरी
ताडन करीती पर्जन्यमोती
वर्षांजलिने उधळण करीता
मंजूळध्वनी कर्णपूरण करती

रोमांचित काया रेशीमस्वप्नी
शीतस्पर्शी त्या नवपालवीने
गवतमातीचा हा मृदूगालिचा
पदतल सुखवी कलाकारीने

रंगछटा रानी अगणित किती
नेत्रसुखद हा रंगपट विरळा
चित्रकर्त्याची जणू चित्रशाला
भासे सृष्टीचा सृजनसोहळा

रसरसामृत भरुनी रानमेवा
चाखूनी तृप्त तृषार्त रसना
मधुराम्लाची  जिव्हालालसा
संपृक्त ती भावना वर्षासना

मृदगंध वाहतो सर्द सुगंधी
नेत्र मिटती  मद मस्तिष्का
दिव्यानुभूती घेई नासिका
अत्तर शिंपिती तृणपुष्पिका

मौक्तिकमणीच सुस्नात गमे
नीरबिंदू मोहक पर्णकोंदणी
पीककंठी स्वर दिव्य निनादे
विश्वरचयिता रचित रागीणी

.....डॉ. शिवाजी काळे.

Monday, 15 June 2015

माणूस आणि नाते......

माणूस आणि नाते.....

       माणूस हा प्रत्येक नात्याशी भावनिक रित्या गुंतलेला असतो.
        भावना म्हणजे मनात उमटलेल्या अनेक गोष्टींचे , विचारांचे तरंग.... जसजसे हे वेगवेगळे तरंग उमटतात, तसतसा हा भावनिक गुंता वाढत जातो. प्रत्येक वेळी त्या तरंगांची तीव्रता कमी जास्त असते.
         कधी कधी त्यात अपेक्षाही डोकावयाला लागतात, मग आपण नात्यांकडे स्वतंत्रपणे पाहू शकत नाही.....
मला तर असे वाटते की, अपेक्षा आणि भावना ह्या जीवलग सख्या प्रत्येक ठिकाणी गोंधळ करतात..... त्या एकत्र असल्या की प्रत्येक वेळी नात्यांना दिले जाणारे महत्व बदलते आणि ह्याच वेळी नात्यांत गैरसमज होणे, नाती दुरावणे हे प्रकार होतात....
          पण प्रत्येक नाते हे वेगळे असते, आपल्या आयुष्यात त्याचे महत्व वेगळे असते आणि काही ऋणाणुबंधाना नात्यांचे नाव देऊ नये..... अशी नाती वेळेनुसार रुप बदलतात, जसे--- मैत्री, प्रेम, गुरू-शिष्य, सहचर, परिक्षक, टीकाकार, तर कधी आई-वडील व मुल....
          बऱ्याच वेळा माणसालाही प्रवाहानुसार वहावे लागते आणि बहुतेक अंशी तेच ईष्ट असते, अशा वेळी ती व्यक्त स्वत:ला फसवत नसते,,, तर स्वतःच्या मनावर सद्सद् विवेक बुद्धीची पकड घट्ट करत असते... आणि असे करुनच नाते जपण्याचा प्रयत्न चालू असतो....
          नात्यांची सरमिसळ न करता,,,,, ते त्या त्या कांगोऱ्यात बसवून जपले पाहिजे आणि प्रत्येक नाते जरी आपापल्या जागी योग्य असले तरी आपले जीवन हे अनेक नात्यांचे मिश्रण आहे..... त्यामूळे सर्वच नात्यांचा एकमेकांवर थोडयाफार प्रमाणात प्रभाव पडतोच...
           आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा, आपुलकी, हट्टीपणा बरोबरच थोडाफार तटस्थपणाही येऊ द्यावा..... प्रत्येक नात्यात बांधीलकी इतकीच मोकळीकही असावी त्यामुळे नात्यांचे बंध अधिक घट्ट होतात,,,, तसेच प्रसंगी माघारही घ्यावी....
       जीवनात आपण स्वतःशीही हळुवार सुसंवाद करावा..... जे स्वतःला उत्तमरित्या जाणतात ते इतरांनाही चांगले समजावून घेऊ शकतात...... परिणामी सर्व नाती,,,, ऋणानुबंध नेहमीच घट्ट गुंफूंन ठेवतात......

----- डॉ माधुरी -----

Saturday, 16 May 2015

सप्तपदीविना

      

हृदय दिलेस जरी एकदा
पदोपदी तुझी साथ हवी
दुनियेस दाखविण्या उगा
सप्तपदी कशास हवी

सर्वस्व देण्यास मजला
उताविळ होतीस तू भोळी
पेलण्यास ते माणिकमोती
फाटकी होती माझीच झोळी

मेंदी कंगण मंगळसूत्र सारे
असलेच जरी दुसर्याचे
हृदयी तुझ्या गोंदण मात्र
फक्त माझ्याच नावाचे

आणाभाका वचने सारी
हीच मंगलाष्टके आता
आठवणींच्या बोहल्यावर चढलो
गीत तुझे गाता गाता

सजलीधजलीस दुसर्यासाठी
फुलवला त्याचा मळा
पाशात माझ्या हृदय तुझे
तोडशील कशी ही बंदीशाळा

मनाने वरीलेस मजला
नी हृदय देऊन टाकीले
उपकार तुझे विसरु कसा
झोपडीस महाल करुन टाकीले

           ---डॉ. शिवाजी काळे.

Sunday, 10 May 2015

लेक लाडकी मिळे सागरा

पर्वतपित्याच्या मांडीवरती
झिम्मा खेळते नदी
अवखळ खळखळ गीत गाते
पोर त्याची आनंदी

वृक्षकरांनी सावरी पिता
निसरड्या त्या वाटा
लाड पुरवी आनंदाने जरी
झिजवी तिच्या लाटा

ऐटीत वाहते मैदानी तेव्हा
दिसे तारुण्याचा तोरा
दुरुन करता राखण तिची
हृदयी मायेचा झरा

वितळून पिता पुरवी तिजला
अमृतभरले पाणी
साद घालती हृदयी तिच्या
सागराची गाजगाणी

गोडवाच सदा राहू दे जरी
असेल सागर खारा
आशिष पित्याचे हेच बाळा
सुखी तुझ्या संसारा

लेक लाडकी मिळे सागरा
ढगभरल्या आठवणी
शिखर लपवून ढगात त्या
बाप करी पाठवणी

          --डॉ. शिवाजी काळे.

Saturday, 9 May 2015

मैत्री _ एक परिपूर्ण नाते

मैत्री एक परिपुर्ण नाते का आहे या प्रश्नाचे एक सोपे ऊत्तर ...या नात्याच्या मानगुटीवर अपेक्षा आणि स्वार्थाचे बेगडी ओझे नाही ! जिथे मस्करी आहे राग नाही . जिथे चिडवणे आहे पण हेटाळणी नाही . जिथे शिकवण आहे पण निंदा नाही . जिथे कौतुक आहे पण खुशमस्करी नाही . जिथे स्वैराचार नसतो एक रेष असते अस्पष्ट आणि ठळकही मर्यादेची ! जीवनात , प्रत्येकाच्या जीवनात अशी वेळ येतेच जिथे अश्या परिपुर्ण नात्याची गरज भासते . बारावीनंतर करियर सेट करायची गडबड .. ते झाले कि आला संसार ... सगळा संसार नीट मांडून होतो . मुले मोठी होतात , त्यांना मग त्यांच्या स्पेसची गरज भासते ....आपली स्पेस आता तयार होते ... गरज नसते तेव्हा ! मग भयंकर रिकामी अशी पोकळी ! स्पेस ...जिवाला कुरतडत रहाते ..मनाला , शरिराला आणखी पोकळ करत जाते ... वेळ असतो ,पैसा असतो ...कमी असते उर्जा आणि माणसांची ! अशा वेळी धावून येतात तेच सवंगडी ज्यांना सोडून आयुष्याच्या मागे पळत असतो आपण ... इथपर्यंत आलेलो असतो . आता तेच सवंगडी आता जिवाभावाचे मित्र / मैत्रिणी होतात . पुन्हा जगणे चालू होते ...हो जगणेच. निखळ संवाद चालू होतो ...अगदीच लहान मुलांसारखा ... कधी मग अचानक कुणाला मोठे असल्याची जाणीव होते , सारे एकदमच मोठे होतात आणि एक प्रगल्भ संवाद रंगतो ...एखादा अचानक उगवतो आणि एका विनोदाची पेरणी अशी करतो कि सारे लहान होऊन खिदळू लागतात ... खरंच जीवन हसण्यासाठीच आहे मित्रांनो ....अशी ही मैत्री ...

Monday, 27 April 2015

राग

क्रोध तुझा गे सखये
जणू थंडगार वारा
वेडावूनी मन गेले
अन झुकला कि गं पारा

........संध्या

राग लटका नाकावरी
पाहुणा बनून येतो
चिमटे काढायचे विसरुन
गुदगुल्या करुन जातो

......... शिवाजी

लटक्या रागाला
इथे नाही थारा
हृदयात वाही
स्नेहाचा झरा...

......... माधुरी

रुसवा तुझा असतो
जसा पाण्यावरचा तरंग
खोल ठाव घेतो अन्
उलगडतो मनीचे अंतरंग

अगंतुक पाहूण्यासारखा
न बोलावता येतोस
नकोश्या आठवणी
कायमच्या देवून जातोस

........... सुहास

वेदना

 

वेदनेचा आज माझ्या
मी लिलाव ठेवला होता
ढुंकून पाहीना कोणी
भावही विचारला नाही

वेदनाच किमती माझी
बाजाराचा नाही गुन्हा
बोली लावण्यास कोणी
दिलदार भेटला नाही

फुकटात वाटल्या होत्या
मी राशी आनंदाच्या
लुटून पसार की झाली
कृतघ्न कशी दुनिया ही

वेदनेला आज माझ्या
पोरके करुन गेलात जरी
विसरु नका दोस्तहो
काळजात ठेवीन तिलाही

वाहीले आहे ओझे मी
अजूनही वाहतोच आहे
दुनियेचा भार वाहताना
माझे मला जड नाही

आनंद सुख समाधान
या लबाड भावना सार्या
कंगाल मी झालो तरी
माझी वेदना फितूर नाही

           ----डॉ. शिवाजी काळे.

वेदनाच ती.....

वेदनाच ती......

तशी प्रत्येकालाच भेटते
आयुष्यात कधीतरी ,
बऱ्याचदा थोडा वेळ तर
कधी जास्त साथ देते ती...

मलाही लहानपणापासून
भेटायची अल्प काळासाठी,
जरा साथ द्यायची अन्
परतण्यासाठी निघून जायची ती...

एकदा अशीच भेटली
म्हणाली माझा स्वीकार करशील,
अन् नकळत माझ्यातच
पूर्ण सामावून गेली ती...

कधी असते सर्वसाधारण
तर कधी होते सैरभैर,
तिचं माझ्यातलं अस्तित्व
मला जाणवून देतेच ती...

तसं शीतयुद्ध आहे आमचं
कधीतरी माझा विजय,
पण  बऱ्याच  वेळा
मला  हरवतेच  ती...

मंजूर आहे मलाही
तिच्याकडून नेहमीच हरणं,
कारण सुख-दुःख न्
सामंजस्याची जाणीवच् ती...

          ------डॉ माधुरी----

Tuesday, 21 April 2015

वाट तुझीच पाही.....

वाट तुझीच पाही.....

लेवून गाली
लञ्जेची लाली
अधीर मन माझे
वाट कुणाची पाही.....

हातावरल्या
नक्षीदार मेहंदीसवे
गुंफित स्वप्ने
वाट कुणाची पाही.....

सगे सोयरे
समीप सगळे
तरी उतावीळ मन
वाट कुणाची पाही.....

शकुनाच्या हळदीने
माखली काया
तरी चोरून मन माझे
वाट कुणाची पाही.....

अंगी लेवून
शालू भरजरी
उभी मी नवरी
वाट कुणाची पाही.....

हाती चूडा
पायी जोडवी
सजून धजून मन
वाट कुणाची पाही......

धन्य झाले
घालून मंगळसूत्र
सलज्ज मन माझे
वाट तूझीच पाहे......

अंगी पडता
आशिष अक्षता
मोहरून मी सख्या
वाट तूझीच पाही.....

वाट तूझीच पाही......

----- डॉ माधुरी -----

Wednesday, 15 April 2015

घर तो...संसार ती

   

स्वप्न ती
वास्तव तो
वरुन विझला तरी
आतून विस्तव तो

गुणी ती
मानी तो
खवळून उफाळणारं
दर्याचं पाणी  तो

शीतल ती
उष्ण तो
राधेला कान्हा जरी
कंसाला कृष्ण तो

कोमल ती
राकट तो
धनुष्य पेलणारं
पुष्ट मनगट तो

मुग्ध ती
नाद तो
गाभार्यात घुमणारा
उच्चतम निनाद तो

भीती ती
धैर्य तो
काळोखाला कापणारं
तेजस्वी शौर्य तो

रुक्ष तो
श्राव्य ती
गोड गळ्यामधलं
सुरेल काव्य ती

अरसिक तो
आस्वाद ती
जीभेवर रेंगाळणारा
पक्वान्नाचा स्वाद ती

ओंगळ तो
साज ती
लावण्याच्या धुंदीतला
नखरेल बाज ती

क्रोध तो
माया ती
तापलेल्या वाटेवर
झाडाखालची छाया ती

तांडव तो
रती ती
आगीशी खेळणारी
शंकराची सती ती

पसारा तो
आवर ती
स्वप्नीच्या घरट्यातला
निरंतर वावर ती

नाट्य तो नांदी ती
रेषा तो रंग ती
राग तो ठुमरी ती
बाग तो पुष्प ती
अत्तर तो गंध ती
भाव तो भक्ती ती
गीत तो संगीत ती
घर तो संसार ती

    ----डॉ. शिवाजी काळे.

Thursday, 9 April 2015

.... प्रेम ....

.... प्रेम ...

कधी ते उत्कट व्यक्त
तर कधी अबोल शांत..
    
कधी सुंदर सहजीवन
तर कधी एकाकी जीवन...

त्या विना जगण्याला ना अर्थ
त्या विना सगळेच आहे व्यर्थ...

ती एक सुंदर अनुभूति
जीवनाची गोड भूमिती....

त्यात नाही हरणे - जिंकणे
त्यामुळेच आहे सुंदर जगणे....

प्रेम म्हणजे इंद्रधनुचे रंग
प्रेमाविना जीवन बेरंग....

प्रेम हा अथांग सागर
मिश्र भावनांचा जागर....

ईश्वरीय अनमोल ठेवा
मनामनांत जपून ठेवा....

---डॉ माधूरी---

Tuesday, 7 April 2015

शरदाचे ते चांदणे

  

नशीबी फक्त उरले तुझ्या
                 या ग्रीष्मातच भाजणे
विसर आता वेड्या मना रे
                 शरदाचे ते चांदणे

नादान कसा रे कवी तू
                 करी शब्दाविनाच कविता
वल्हवितो जिथे नौका
                 जलाविना ही सरीता

रंग उडाले या जीवनाचे
                 उरली फक्त रेखाटने
विसर आता वेड्या मना रे
                 शरदाचे ते चांदणे

वसंत आला आणिक गेला
                नाही फुलला ताटवा
सुकल्या त्या फळात आता
                येईल कसा रे गोडवा

गोठल्या त्या श्रावणधारा
                अन् चिंब होऊन भिजणे
विसर आता वेड्या मना रे
                 शरदाचे ते चांदणे

पिळ हृदयी पडला वाटे
                अंधारल्या दाही दिशा
जगण्यामरण्या साथ देई
                वेदनेची ही नशा

विखार पचविण्या फक्त
               उरले हे कोरडे जिणे
विसर आता वेड्या मना रे
                 शरदाचे ते चांदणे.

            ------डॉ. शिवाजी काळे.

Tuesday, 31 March 2015

स्वप्न

जून महिना अर्धा अधिक संपला पण पावसाचा तपास नव्हता . मे महिन्यासारखेच उन मी म्हणत होते सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवायचा . आठ नऊ वाजताच चांगले चटचटीत उन पडायचे , दुपार तर नकोशी होऊन जात होती . बाहेर बघायलाही जीव धजावत नव्हता . भोवती नांगरून ठेवलेलं शेत , ना पीक ना पाणी सगळी ढेकळं , लहान मोठी जिथवर नजर जाईल तिथवर ढेकळानचेच राज्य ! कुठेतरी बांधावर एखादा कडूनिंब हिरवा दिसायचा , एखादी चिंच तर एखादे कवठाचे झाड . विहिरीच्या पाण्याने तर कधीच तळ गाठला होता . पिण्यापुरते पाणी बळेच मिळायचे , बाकी सगळा रुक्ष उन्हाळा ! उन्हाच्या झळांनी अंगाची लाही होत होती , जनावरे आणि माणसेही घामात भिजलेली . त्या सुर्याला तर लपायची बिलकुल घाई नसायची . पावसाची वाट पाहून तर सर्व दमून गेले होते . भलामोठा दिवस संपता संपत नव्हता .आता सर्व नजरा पावसाची वाट पाहत होत्या फक्त ! आज सकाळपासून ज्योतीचे घर मात्र शांत आणि दाबून हवा भरलेल्या फुग्यासारखे तंग होते . सर्वांच्याच मनात एक उलघाल होत होती . उकाड्याने नव्हती तर कुणाला काळजीने तर कुणाला भीतीने ! सकाळपासून आवाजाने गजबजणारे घर आज स्मशानशांत होते . फक्त भांड्यांचा आवाज चालू होता . ज्योतीच्या मनाचा तर थांगच लागत नव्हता आणि इकडून तिकडे फिरणे बंद होत नव्हते . असतील त्या सर्व देवांना साकडे घालून झाले होते . तिलाही कल्पना होती की मला नक्की चांगले मार्क पडणार आहेत कारण वर्षभर कसोशीने , मन लावून अभ्यास केला होता . मिनिटांच्या हिशोबाने अभ्यास करायची , पेपर पण चांगले होते . पण बारावी विज्ञान शाखेचा निकाल म्हणजे काळीज थोडे घाबरणारच ना ? तीन वाजता कॉलेजमध्ये कळणार मग कुणी फोन करून सांगणार , पण ते तीन वाजेपर्यंत वेळ कसा जाणार होता या तंग आणि शांत वातावरणात तेच कळत नव्हते ..आशा आणि निराशेच्या झुल्यावर तिचे मन कधी उंच आकाशात झेपावत होते तर कधी जमिनीला येऊन भिडत होते . अशा या निर्णयात्मक वेळीच खरे तर मनाच्या ठामपणाचा , प्रगल्भतेचा आणि जिद्दीचा कस लागतो . अश्या वेळीच माणसाला अनेक गोष्टींची जाणीव होते . महत्वाचे म्हणजे स्वतः किती खंबीर राहावे लागते याची ..पण काही झाले , कितीही ज्ञानी मनुष्य असला तरी त्याचे मन थोडे तरी हेलकावे खातेच आणि ही तर फक्त नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेली अवखळ ललना होती … एक जीवनाने ओतप्रोत बहरलेली कालिका! आईपण तिच्याच विचारत गढून गेलेली , तिच्याच काळजीत बुडून गेलेली हातातली कामे एखाद्या यंत्राप्रमाणे बाजूला करत होती . आईच ती , लेकराच्या प्रत्येक स्पंदनाचा ठाव घेणारी माऊली , लेकरांच्या सुखस्वप्नांनी हुरळून जाणारी माय आणि काळजीने दु:खी होणारी आई ! आण्णा मात्र एखाद्या शांत अथांग तळ्यासारखे भासत होते . आई आपल्या लेकराविषयीची माया प्रेम दाखवत असते तसे वडिलांना धड दाखवताही येत नाही पण आत एक सागर उचंबळून येत असतो ,आणि पुन्हा शांत होत असतो . मनात चाललेला भारती ओहोटीचा खेळ चेहऱ्यावर दिसूनही चालत नाही .. शेतात काहीच काम नव्हते तरी आण्णांनी आज लवकरच शेताचा रस्ता धरला होता , फिरत फिरत प्रत्येक बांध पायाखाली घातला . नजरेसमोर फक्त ढेकळं आणि आत उधाणलेला सागर …. पाय दमले पण आठवणींचा वारा मनात पिंगा घालत होता . प्रत्येक आठवण हृदयाला स्पर्शून जात होती . बांधाच्या कोपऱ्यावर एका चिंचेच्या सावलीला आण्णा थोडावेळ विसावले . त्याच जागेवर सुटीच्या दिवशी ज्योती दिवसभर अभ्यास करायची ...पाणी वाहून गेलेल्या पाटाच्या भोवतीची जागा थंड राहायची आणि दोन चिंचांच्या मध्ये असल्याने सावलीही दिवसभर हटत नसायची ..शक्यतो दिवसभर या बाजूला कुणी फिरकत पण नव्हते .. त्या शांततेत अभ्यास करणे ज्योतीला खूप आवडायचे अगदी तहानभुकेने पण ती तिथून हलत नसायची ..तिथेच आण्णा मुद्दाम जावून बसले . समोर काळीभोर माती पसरली होती आणि मनात काळ्याकुट्ट भूतकाळाची भुते डोके वर काढत होती …. आजही तो दिवस आण्णा विसरत नव्हते . इतक्या दिवसात रोज एकदा तरी ते क्षण मनात येऊन जायचे शाळेत जाणारी मुले पाहिली की ...तीस वर्षांचा काळ लोटला तरी ते क्षण एक रक्ताळलेला ओरखडा रोज मनावर उमटवत होते , पण त्यांनी ही गोष्ट कधी कुणापुढे व्यक्त केली नव्हती . पण हे सर्व कुणापासून लपलेही नव्हते घरातल्या प्रत्येकाला माहित होते कारण आजीने, आण्णांच्या आईने प्रत्येकाला एकदा तरी सांगितले होते . काही जखमा इतक्या गहिऱ्या असतात की त्या बुजवता बुजत नाहीत , परत परत नव्याने वेदना देत राहतात , अगदी त्या दिवसासारख्या ज्या दिवशी त्या घडल्या ! सकाळी लवकर उठून अंघोळ उरकलेली आण्णांनी, कारण गुरं रानात नेऊन बांधायची आणि दफ्तर सावरत परत शाळा पण गाठायची होती . आईने ताटलीत दिलेला चहा कसातरी घश्याखाली उतरवला . गाया वासरे सोडून पळतच रानातल्या गोठ्यात नेऊन बांधली . पळतच येऊन परत हातपायला पाणी लावले . शाळेची कपडे घातली . कपडे पण मागच्याच वर्षीची म्हणून थोडी आपरीच होती कारण नानांनी आजून नवीन शाळेची कपडे आणलीच नव्हती . आण्णा आता आठवीत गेले होते . गावात फक्त सातवी पर्यंत शाळा होती आठवीला तालुक्याच्या गावी जावे लागे पण तालुक्याचे ठिकाण जवळ असल्याने त्याची काही अडचण नव्हती . वर्गात पहिला नंबर म्हणून हायस्कूलच्या सरांनी परस्पर दाखले काढून नेऊन अडमिशन केलेले . अभ्यासाची मनापासून आवड असणाऱ्या आण्णांनी कधी पहिला नंबर सोडला नव्हता . घरातील मोठा मुलगा म्हणून घराची रानातली बरीच कामे त्यांनाच करावी लागत . पण कुरकुर नव्हती आणि नानांपुढे कुरकुर करायची बिशाद पण नव्हती . नाना चिडले की ओल्या कावळीचा फोक करून पोटऱ्या रक्ताळतील तोवर सटकावत राहायचे . भीतीपोटी अवाक्षर काढायची कुणाची हिम्मत नव्हती . नाना अंघोळ देवपूजा आटोपून स्वयंपाकाच्या घरातून चहा घेत आण्णांची धावपळ बघत होते . काही ठाम निश्चय मनात ठेवून नाना गरजले , “आण्णा ssss” धावतच आण्णा नानांच्या पुढ्यात येऊन उभे राहिले धपापत्या छातीने “काय नाना ?” “काय ...क्या करतो ओ म्हण .” नाना चढ्या आवाजात गरजले . “ओ नाना” खाली मान घालून आण्णा . “पहिले आणि शेवटचे सांगतो आजपासून शाळा बंद . घरच्या मालकाने शाळा शिकायची मग गड्यांकडून काम कोण करून घेणार ? आजपासून मळ्यातलं सगळं काम तु बघायचं . तु कर आणि गड्यांकून करून पण घे . आता आपारी चड्डी काढून धोतर नेसायचं .” इतके सांगून नाना निघून गेले . आण्णा मात्र तिथंच गपकन खाली बसले .त्यांच्या सर्व स्वप्नांवर पाणी पडले होते . आता एकच गोष्ट शिल्लक होती बैलाप्रमाणे मरमर राबणे . डोळ्यातून अखंड पाणी वाहत राहिले … आईने मायेने पाठीहून हात फिरवला पण तीही बापडी तेव्हड्याच कृतीची धनी होती . पुढे अवाक्षर बोलायची तिची पण हिम्मत नव्हती . आण्णांनी दिवसभर अन्नाचा कण पोटात ढकलला नाही की घोटभर पाणी . पूर्ण दिवस रडत एका कोपऱ्यात बसून राहिले आण्णा . दुसरा दिवस पण तसाच गेला . मग मात्र रात्री नानांनी स्वताहून अण्णांना जेऊ घातले . त्यांचे प्रेम कळत होते अण्णांना , पण त्यांचे प्रेम त्यांचे विचार बदलू शकत नव्हते हेही अण्णांना तितकेच माहित होते . तीन चार दिवसांनी आण्णा कामाला लागले . धोतर नेसता येईना तर नानांनी स्वतः मदत केली आणि शिकवले . बरोबरची मुले शाळेत जाताना अण्णांना अतीव दु:ख होई परंतु त्यांचा इलाज नव्हता . एके दिवशी दुपारी अण्णांचे हायस्कूलचे एक शिक्षक नानांकडे आले . अण्णांच्या आशा थोड्या पल्लवीत झाल्या . सावंत सर हे विज्ञानाचे शिक्षक , शिकवताना अगदी समरसून शिकवायचे आणि या आठवीच्या वर्गातील आण्णा हे त्यांचे आवडते विध्यार्थी बनले होते अगदी महिनाभरात . सावंत सर पूर्ण जाणून होते की खरंच अश्या विद्यार्थ्यांची गरज आहे शाळेला . सावंत सर एकेक दिवशी रंगांबद्दल शिकवत होते . सर्व सांगून झाल्यावर कुणाच्या शंका आहेत का म्हणून सरांनी विचारले . तर अण्णांनी एक प्रश्न विचारलेला त्यांना ,”सर , उन वाढले की काळ्या रंगाचे प्राणीच का पाण्यात बसतात पांढरे का नाही ?” त्या वेळी त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही पण नंतर अभ्यास करून त्यांनी सांगितले , “ काळा रंग हा उष्णता शोषून घेतो म्हणून उन्हात या प्राण्यांना उष्णता जास्त जाणवते आणि ती काहिली कमी होण्यासाठी ते पाण्याचा आधार घेतात .” त्या वेळी असे प्रश्न म्हणजे खूप चांगली बौद्धिक पातळी असेच सरांचे समीकरण होते . आणि अश्या हुशार विद्यार्थ्याला गमवायचे नव्हते सावंत सरांना . म्हणून नानांचा स्वभाव माहित असूनही ते त्यांना समजावण्यासाठी आले होते . “नमस्कार नाना .” सर नानांना नमस्कार करून शेजारी बसले . तोवर ताईने सरांना पाणी आणून दिले . “नमस्कार सर , का येणं केलंत , काही काम निघाले का ?” असे विचारले खरे पण नानाही जाणून होते सर येण्याचे कारण “नाही , नाही काम तसे विशेष पण …” अडखळत सर बोलले . “पण काय सर स्पष्ट बोला .” “ त्याचे असे आहे तुमचा आण्णा अभ्यासात हुशार आहे , दहावी पर्यंत शिकवले त्याला तर बरे होईन .”घाईने बोलत सरांनी त्यांचे बोलणे पूर्ण केले . “ते झाले तुमचे सर , बरे होईन हे मला पण कळते . पण आमची अडचण आहे . मी जर आण्णाला शिकवले तर तो अंगाला शेण तर लागून घेईन का ? आमचा शेतकरी धर्म आणि इतकी शेती करायची कोणी हो आमच्या मागे ?” प्रश्नार्थक मुद्रेने नाना सरांना म्हणाले . “ते सर्व खरे आहे पण पोराला शिकायची खूप हौस आहे.” “प्रत्येकाची प्रत्येक हौस पूर्ण करणे शक्य नसते सर , आणि शिकून काय मिळणार ? त्यापेक्षा त्याला शेत जास्त पैसा देईन .” या उत्तरावर सर नक्की निरुत्तर होणार याची खात्री होती नानांना . सरांना कळून चुकले आभाळाला कितीही दगड मारले तरी आभाळ थोडेच खाली येईल ...नानांच्या निग्रहापुढे सरांचे पण काही चालले नाही . चहा घेऊन सरही चालते झाले . आण्णांची मात्र होती नव्हती ती सर्व आशा मावळली . मघाशी सर आले तेंव्हा अपेक्षांची उंचावलेली मान पुन्हा नजर जमिनीत खुपसून खाली झाली . शिकण्याची हौस मात्र होती तशीच गाळ विहिरीच्या तळाला जाऊन बसावा तशी मनाच्या तळाला लागली . भरते आले की कधी कधी डोळ्यातून वाहण्यासाठी …. आजही तशीच भरती आली होती मनाला . आज त्यांची मुले मोठी झाली तरी वर्चस्व मात्र नानांचे होते . ते फक्त कामाचे धनी बाकी सर्व नानांकडे . ज्योतिही आण्णानसारखी शिकण्यासाठी आसुसलेली . स्वताचा ठसा समाजात उमटवण्याची इच्छा उराशी बाळगून . आण्णांना तिची तगमग उमजत होती पण काही बोलत नव्हते ते . ती पास होणार तेही चांगल्या मार्कांनी यात तसूभरही शंका नव्हती त्यांना पण पुढे काय ? हा यक्षप्रश्न होता . तिचे माझ्यासारखे होईन की होतील तिची स्वप्ने साकार ? लेकरांच्या समाधानात आईबापाचा स्वर्ग असतो पण लेकरू उदास तर कसे होणार ? समोरच्या ढेकळात एक रोप उगवेल ही अपेक्षा किती निरर्थक आहे ? पण स्वप्ने असतील तर माणूस आहे , नसतील तर त्याचे जीवन तिथेच पूर्णविराम घेते . आणि कुणी म्हटले पण आहे ‘आशेवर जग जगते’ या आशेतून चांगल्या गोष्टींची बीजे तयार होतात, पुन्हा उगवण्यासाठी … आज आण्णांनी या कोंडीला तोंड फोडायचे ठरवले , पण त्यांनी हेही ठरवले की आधी ज्योतीची तळमळ पाहायची , तिने एक पाउल टाकले की तिला आधार द्यायचा . या विचाराने आण्णांचे मन प्रसन्न झाले आणि त्या काळ्या ढेकळांच्या कानव्हास वर ती हिरवी झाडे जास्तच हिरवी दिसू लागली , त्यांच्यासारखी मनालाही पालवी फुटली होती ...स्वप्नांची … लांबून पळत येत असलेली ज्योती दिसली , ढेकळांना न जुमानता ती धावत होती . धापा टाकत ती आण्णांच्या जवळ आली पण तिच्या तोंडून शब्द फुटेना , फक्त हसत होती . निकाल चांगला लागला हे आण्णांनी ताडले . “आण्णा मला न ८० % मार्क मिळाले .” हसत , धापा टाकत ती कसेतरी बोलली . वाकून आण्णांच्या पायाला तिने स्पर्श केला . “शाब्बास बाळा छान झाले , बस आता इथे .”शेजारी बोट दाखवत आण्णा बोलले . “काय ?” शेजारी बसत ज्योती विचारू लागली . “आता काय करायचे पुढे ?” अचानक आलेल्या प्रश्नाने ज्योती भांबावली पण क्षणात तिची कळी खुलली आणि उत्साहाने ती सांगू लागली . “आण्णा , मला न , मला डॉक्टर व्हायचंय..आणि मला मार्क पण चांगले आहेत न आता.” आण्णांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली , आज आपली ही पोर नक्की आपले स्वप्न सत्यात आणणार . मी कितीही कष्ट करीन पण हिला काही कमी पडू देणार नाही . स्वप्नांचे मनोरे पुन्हा उभे राहिले पण नानांची आठवण येताच मन उदास झाले . आण्णा काही उत्तर देत नाही म्हटल्यावर , ज्योती पाहत राहिली त्यांच्याकडे . माझे काही चुकले का असे विचारावे वाटले . पण आधी उत्साही आणि नंतर गढूळ झालेला आण्णांचा चेहरा पाहून ती शांत झाली . “ज्योतीबाई सगळे ठीक आहे पण नाना शिकू देतील का ? त्यात त्यांनी आत्याला सांगितले आहे आमची नात सुनबाई करायची आहे म्हणून . मग आता लग्नाची घाई करतील .” आण्णांना तिच्या मनाचा ठाव घ्यायचा होता. “आण्णा तुम्हाला काय वाटते सांगा न ? मी नानांना समजावणार आहे , मी नाही स्वताची स्वप्ने धुळीला मिळताना पाहू शकणार .तुमची इच्छा सांगा फक्त .” ज्योती पोटतिडकीने बोलत होती,”आणि नाना किती लाड करतात बरे माझे ? मग नाही म्हणणार नाहीत मला .” “लाड वेगळे आणि शिकवणे वेगळे असते ज्योती .” तिला समजावत आण्णा म्हणाले . “पण आण्णा तुमची तर इच्छा आहे न ?” “हो .” “मग तुम्हीच सांगा न नानांना .” “आधी तु सांग मग बघू .” आण्णा फक्त बघू म्हटले पण ज्योतीचे मन आनंदाने भरून आले . पुढे काही होवो पण आण्णा माझ्या सोबत आहेत इतकेच मला पुरेशे आहे , मनाशीच बोलली ती ! “आण्णा एक विचारू ?” “हो , विचार की .” “मी का सांगू आधी तशी पण वेलीला झाडाच्या आधाराची गरज असतेच ना ?” “हो पोरी पण जी वेल आधाराशिवाय वाढते न तीचा बुंधा मोठा होतो आणि तो एकटाच त्या वेलीचे ओझे उचलायला समर्थ बनतो . मग जरी झाड करपून गेले तरी वेल करपत नाही . ती वाढतच राहते , आभाळाकडे …”आण्णांच्या डोळ्यात पाणी तरळत होते . “आण्णा sssss”अति आनंदाने ज्योती उद्गारली . आज तिला खूप अभिमान वाटला आण्णांची लेक असल्याचा. आणि मनोमन तिने ठरवले त्यांना पण अभिमान वाटेल मला मुलगी म्हणताना असेच काही नक्की करणार मी ! एका अनोख्या तेजाने तिचे डोळे चकाकत होते … रात्री जेवण उरकल्यावर ज्योतीने नानांना विचारलेच . “नाना आता मला पुढे पण शिकायचे , डॉक्टर व्हायचे , आता आठ दहा दिवसात अडमिशन चालू होतील .” असे बोलत होती जणू एखादे चॉकलेट मागत आहे . तिचे ते निरागस बोलणे ऐकून आधी नाना हसले , नंतर गंभीर होत म्हणाले , “ आता बास शिकणे आत्याच्या पोराला नोकरी लागली आता लग्न ठरवू आणि दिवाळीत उरकून टाकू .” “नाना एक विचारू ?” “हा विचार .” “तुमचं सुख कश्यात आहे ?” “म्हणजे ?” “तुम्हाला आनंद कधी वाटतो ?” “पोरांना आनंदात बघून .” हसुन नाना बोलले . ज्योतीला अपेक्षित उत्तर मिळाल्याने आणखी बरे वाटले . “ मग विचार करा मी सुखी तर आण्णा , आणि आण्णा सुखी तर तुम्ही . पण मला तुम्ही किती मोठा श्रीमंत नवरा दिला तरी माझा आनंद माझ्या पुऱ्या होणाऱ्या स्वप्नात आहे . आणि बळजोरीने तुम्ही माझे लग्न केले तरी मी नाराज असल्याने बाकीच्यांना त्रासच देणार . म्हणजे एकासोबत दोन आयुष्य खराब .” आता नाना गप्प झाले , लाडकी नात होती ज्योती म्हणून ऐकून घेत होते आणि विचार करीत होते . आडकीत्याखाली सुपारी खांडलीत नाना निग्रहाने बोलले ,”पण आता पाहुण्याला शब्द दिला .” “पाहुणे आपलेच आहेत ना नाना , आणि एक सांगू का ?” शेवटचे अस्र काढत ज्योती पुढे बोलू लागली , “आम्हाला जीवशास्त्र पुस्तकात सांगितले आहे , एकाच नात्यातील मुलांत गुणसूत्रे सारखी असल्या कारणाने त्यांना होणारी संतती ही जन्मजात दोष असणारी असते . किंवा काहीवेळा मतिमंद होते . हे कारण तुम्हाला आणि त्यांना पुरेसे नाही का ?” “असे पुस्तकात आहे ?” “हो नाना , आणि असे वेळोवेळी सिद्ध पण झालेय .” “बर ठीक आहे , त्यांना सांगू समजावून , पण शिकणे नको .” “आता का नको ?” पाय आपटीत रडक्या सुरात ज्योती विचारू लागली . “शिकता शिकता तु मोठी होणार , तुझ्या लायक नवरा कसा बघायचा ?” चिडवायच्या हेतूने गालात हसत नाना बोलले . “असे का म्हणता नाना ? इतकी पण मोठी नाही होणार मी , आणि शेवटच्या वर्षाला गेले न डॉक्टरकीच्या मग केले लग्न तरी चालेन.” “बर बघू आण्णाला विचारतो .” “माझी काही हरकत नाही नाना तिला वाटतेय तर शिकू देत .”आण्णा बाहेर येत बोलले . आता दोन मजली हसत नाना बोलले , “आरं अशी शाळा आहे तर तुम्हा बापलेकीची?बर बर असू देत .. शिकू द्या .. तुमचं अपूर्ण राहिलं तिच् पूर्ण करू .” ज्योती दोघांच्या पाया पडून पळत आजीला जाऊन बिलगली . आण्णांच्या डोळ्यात पाणी होते . मनाला भरते आले होते पण आज आनंदाने …...

Saturday, 28 March 2015

कोडी न सुटलेली...

ब्रम्हांड घेईन कवेत मी
वल्गना बहु करीत होतो
हसतेय का मुठीतून मज
             ...रेती सांडलेली !

लिलया पेलीन धनुष्य मी
आव अर्जुनाचा आणित होतो
हास्य कुत्सित करतेय का
           ...प्रत्यंचा तुटलेली !

शिखर गाठलेच होते मी
आणि आरुढ होणार होतो
सांत्वनास आली मज हाती
            ...दोरी सुटलेली !

दुःखात वितळेन कसा मी
स्थितप्रज्ञ भासवित होतो
दगाबाज झालीच कशी ती
            ...लाली नेत्रातली !

परीपूर्ण जगलो जीवन मी
मनास समजावीत होतो
वाकुल्या मग का दाखविती
           ...कोडी न सुटलेली !

            ---डॉ. शिवाजी काळे.

Wednesday, 25 March 2015

....माझी लेक...

माझी  लेक
तुझ्या  येण्याने
     आयुष्य  फळाला  आले
माझ्या  जन्माचे
     तर  सार्थक  झाले.
तुझ्या  बाल - लिला  पाहून
     नकळत  आम्ही  सुखावलो
तुझ्या  बरोबर  आयुष्य
      भरभरून  जगू  लागलो.
तुझं  हासणं - खेेळणं
      जणू  हर्षाची  आठवण
तुझं  रागावणं - रुसणं 
      जणू  आनंदाची  साठवण.
आई  म्हणून  येतेस
       जेव्हा  कुशीत
स्वर्गसूख  मिळते
         तुझ्या  मिठीत
बाबा - बाबा म्हणत
         अधिकार  गाजवतेस
अन्  पटकन  त्याच्या
         मिठीत  सुखावतेस.
यश,  सुख  समृद्धि  आनंद 
         सारे  काही  मिळावे  तुला
तू  सर्वांच्या  शिखरि  असताना
         पाहत  रहावे,  आभा  फक्त  तूला
                           - तुझी  आई
                              ४/३/१५

Tuesday, 24 March 2015

वेदना

काळजावर झेलल्या
जखमा रक्ताळलेल्या
ह्रदयी वेदना सांडल्या
भावनांत गोठलेल्या ..

बहर

संधीप्रकाशाच्या आगमनाने
आठवणींना बहर येतो..
दिनरातीच्या मिलनाने
जणू काळोखही मुग्ध होतो

.....वादळ मनीचे.....

..........वादळ मनीचे........

सखे, नुसतच तुझं
शून्यात पाहणं...

विचारांच्या कोलाहलात
गोंधळून जाणं...

निर्विकार चेहऱ्यामागचे
दुःख लपविणं...

अखंड बडबड सोडून
फक्त अबोल राहणं...

मनीच्या सर्व भावना
मनातच लपवणं...

ओसांडणाऱ्या आश्नूंना
थोपविण्याचा यत्न करणं...

रुद्ध झालेल्या स्वराला
कोमलतेचा साज देणं...

वर-वर शांत राहत
मनीच्या ज्वालामुखीत जळणं...

जीवनरूपी लढाईत
असं मनाला मारणं...

का गं, दुर्मिळ झालं
तुझं खळखळून हासणं...

                   ------डॉ माधुरी-----

आठवण

संधिप्रकाश पांघरुनी
मुग्ध संगीत निर्मिते
मम हृदयीच्या तारा
तुझी आठवण छेडीते..!

Sunday, 22 March 2015

उर्मिला

          

गुन्हा काय घडला प्रभु मज हातुनी
कधी सांगशील काय रे रामा मजला
स्वगृहीच मी जाहले का वनवासीनी
तव बंधुभक्त लक्ष्मणाची मी उर्मिला

भरजरी लेऊनी करु काय गे सीते
विरक्त झालीस जरी भ्रतार साथीला
प्राक्तनात तुझीया होतीच ती वल्कले
परि मी का कवटाळू मम विरहाला

अनुराग तुजला रे समजावा कैसा
प्रभक्ता तू तर ब्रम्हचारी  हनुमंता
आस पतीचरणांची ही काही लपेना
विटून गेले आता या भयाण एकांता

आनंद आसुरी तुजला माये कैकेयी
बलीदान मम संसारा तव मनोरथा
प्रश्न हा पडे मजला या प्रतिक्षेतही
हीच का तुझी वचनपूर्ती दशरथा

भ्राता जीवाहून प्रिय असेल तुजला
प्राण कायीचा या तुच की रे लक्ष्मणा
विरहीणी दारात उभी तुझी उर्मिला
समजावू कशी या व्याकुळल्या मना

             ---डॉ. शिवाजी काळे.