या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Saturday, 21 November 2015

एक कविता...(आसवांनी नाव पुसलेली...)


आजकाल माझं हृदय
सैरावैरा धावत असतं
वाट चुकलेल्या
कोकरासारखं...
भटकत राहतं
कावरंबावरं होऊन
माझ्याच धमन्यांमधून...
शोधत राहतं तुला
आणि तुझ्या 
विखुरलेल्या आठवणींना...
आणि तू
टपकत राहतेस
पापण्यांच्या कडांमधून
आठवांच्या उशीवर...
रात्रभर ...रात्रभर ...

माझ्याच देहातला
हा लपंडाव
मी तटस्थपणे पाहतोय
देहभान विसरुन...
ना वणवा ना ठिणगी
तरीही धुमसतोय बर्फ
आतल्या आत...खोलवर..
तीच धग
वर येऊ पाहतेय
वितळवू पाहतेय
माझी स्थितप्रज्ञता
एका नवीन प्रवाहाला
जन्म देण्यासाठी...
त्याच प्रवाहात
तू टपकत राहतेस
पापण्यांच्या कडांमधून
रात्रभर ...रात्रभर ...

अस्ताव्यस्त पडलेत
मनाचे तुकडे
देहभर...घरभर
आणि आठवांच्या अंगणात ...
अंधारात चाचपडताना
टचकन घुसतो
एखादा तुकडा 
आशावादी हातात
खोलवर...
आणि वाट करुन देतो
थिजलेल्या रक्ताला
पुन्हा वाहण्यासाठी...
त्याच रक्तात
तू टपकत राहतेस
पापण्यांच्या कडांमधून
रात्रभर ...रात्रभर ...

माझे अणुरेणू
बंड करतात आजकाल...
माझ्या तथाकथित 
सोशिकतेच्या विरोधात...
उसळतात
पेटून उठतात
देहभर...मनभर
आणि करु पाहतात सामील
मेंदूलाही..त्यांच्या बंडात...
शेवटी शांत होण्याचा 
अभिनय करतात...
खोट्याच आश्वासनावर
विश्वास ठेऊन...
विझवतात आग
आठवांच्या ओलाव्याने...
आणि तूही टपकत राहतेस
त्याच ओलाव्यासह
पापण्यांच्या कडांमधून
रात्रभर ...दिवसभर...
आणि रात्रभर .........

....डॉ. शिवाजी काळे.

1 comment: