या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Tuesday, 31 March 2015

स्वप्न

जून महिना अर्धा अधिक संपला पण पावसाचा तपास नव्हता . मे महिन्यासारखेच उन मी म्हणत होते सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवायचा . आठ नऊ वाजताच चांगले चटचटीत उन पडायचे , दुपार तर नकोशी होऊन जात होती . बाहेर बघायलाही जीव धजावत नव्हता . भोवती नांगरून ठेवलेलं शेत , ना पीक ना पाणी सगळी ढेकळं , लहान मोठी जिथवर नजर जाईल तिथवर ढेकळानचेच राज्य ! कुठेतरी बांधावर एखादा कडूनिंब हिरवा दिसायचा , एखादी चिंच तर एखादे कवठाचे झाड . विहिरीच्या पाण्याने तर कधीच तळ गाठला होता . पिण्यापुरते पाणी बळेच मिळायचे , बाकी सगळा रुक्ष उन्हाळा ! उन्हाच्या झळांनी अंगाची लाही होत होती , जनावरे आणि माणसेही घामात भिजलेली . त्या सुर्याला तर लपायची बिलकुल घाई नसायची . पावसाची वाट पाहून तर सर्व दमून गेले होते . भलामोठा दिवस संपता संपत नव्हता .आता सर्व नजरा पावसाची वाट पाहत होत्या फक्त ! आज सकाळपासून ज्योतीचे घर मात्र शांत आणि दाबून हवा भरलेल्या फुग्यासारखे तंग होते . सर्वांच्याच मनात एक उलघाल होत होती . उकाड्याने नव्हती तर कुणाला काळजीने तर कुणाला भीतीने ! सकाळपासून आवाजाने गजबजणारे घर आज स्मशानशांत होते . फक्त भांड्यांचा आवाज चालू होता . ज्योतीच्या मनाचा तर थांगच लागत नव्हता आणि इकडून तिकडे फिरणे बंद होत नव्हते . असतील त्या सर्व देवांना साकडे घालून झाले होते . तिलाही कल्पना होती की मला नक्की चांगले मार्क पडणार आहेत कारण वर्षभर कसोशीने , मन लावून अभ्यास केला होता . मिनिटांच्या हिशोबाने अभ्यास करायची , पेपर पण चांगले होते . पण बारावी विज्ञान शाखेचा निकाल म्हणजे काळीज थोडे घाबरणारच ना ? तीन वाजता कॉलेजमध्ये कळणार मग कुणी फोन करून सांगणार , पण ते तीन वाजेपर्यंत वेळ कसा जाणार होता या तंग आणि शांत वातावरणात तेच कळत नव्हते ..आशा आणि निराशेच्या झुल्यावर तिचे मन कधी उंच आकाशात झेपावत होते तर कधी जमिनीला येऊन भिडत होते . अशा या निर्णयात्मक वेळीच खरे तर मनाच्या ठामपणाचा , प्रगल्भतेचा आणि जिद्दीचा कस लागतो . अश्या वेळीच माणसाला अनेक गोष्टींची जाणीव होते . महत्वाचे म्हणजे स्वतः किती खंबीर राहावे लागते याची ..पण काही झाले , कितीही ज्ञानी मनुष्य असला तरी त्याचे मन थोडे तरी हेलकावे खातेच आणि ही तर फक्त नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेली अवखळ ललना होती … एक जीवनाने ओतप्रोत बहरलेली कालिका! आईपण तिच्याच विचारत गढून गेलेली , तिच्याच काळजीत बुडून गेलेली हातातली कामे एखाद्या यंत्राप्रमाणे बाजूला करत होती . आईच ती , लेकराच्या प्रत्येक स्पंदनाचा ठाव घेणारी माऊली , लेकरांच्या सुखस्वप्नांनी हुरळून जाणारी माय आणि काळजीने दु:खी होणारी आई ! आण्णा मात्र एखाद्या शांत अथांग तळ्यासारखे भासत होते . आई आपल्या लेकराविषयीची माया प्रेम दाखवत असते तसे वडिलांना धड दाखवताही येत नाही पण आत एक सागर उचंबळून येत असतो ,आणि पुन्हा शांत होत असतो . मनात चाललेला भारती ओहोटीचा खेळ चेहऱ्यावर दिसूनही चालत नाही .. शेतात काहीच काम नव्हते तरी आण्णांनी आज लवकरच शेताचा रस्ता धरला होता , फिरत फिरत प्रत्येक बांध पायाखाली घातला . नजरेसमोर फक्त ढेकळं आणि आत उधाणलेला सागर …. पाय दमले पण आठवणींचा वारा मनात पिंगा घालत होता . प्रत्येक आठवण हृदयाला स्पर्शून जात होती . बांधाच्या कोपऱ्यावर एका चिंचेच्या सावलीला आण्णा थोडावेळ विसावले . त्याच जागेवर सुटीच्या दिवशी ज्योती दिवसभर अभ्यास करायची ...पाणी वाहून गेलेल्या पाटाच्या भोवतीची जागा थंड राहायची आणि दोन चिंचांच्या मध्ये असल्याने सावलीही दिवसभर हटत नसायची ..शक्यतो दिवसभर या बाजूला कुणी फिरकत पण नव्हते .. त्या शांततेत अभ्यास करणे ज्योतीला खूप आवडायचे अगदी तहानभुकेने पण ती तिथून हलत नसायची ..तिथेच आण्णा मुद्दाम जावून बसले . समोर काळीभोर माती पसरली होती आणि मनात काळ्याकुट्ट भूतकाळाची भुते डोके वर काढत होती …. आजही तो दिवस आण्णा विसरत नव्हते . इतक्या दिवसात रोज एकदा तरी ते क्षण मनात येऊन जायचे शाळेत जाणारी मुले पाहिली की ...तीस वर्षांचा काळ लोटला तरी ते क्षण एक रक्ताळलेला ओरखडा रोज मनावर उमटवत होते , पण त्यांनी ही गोष्ट कधी कुणापुढे व्यक्त केली नव्हती . पण हे सर्व कुणापासून लपलेही नव्हते घरातल्या प्रत्येकाला माहित होते कारण आजीने, आण्णांच्या आईने प्रत्येकाला एकदा तरी सांगितले होते . काही जखमा इतक्या गहिऱ्या असतात की त्या बुजवता बुजत नाहीत , परत परत नव्याने वेदना देत राहतात , अगदी त्या दिवसासारख्या ज्या दिवशी त्या घडल्या ! सकाळी लवकर उठून अंघोळ उरकलेली आण्णांनी, कारण गुरं रानात नेऊन बांधायची आणि दफ्तर सावरत परत शाळा पण गाठायची होती . आईने ताटलीत दिलेला चहा कसातरी घश्याखाली उतरवला . गाया वासरे सोडून पळतच रानातल्या गोठ्यात नेऊन बांधली . पळतच येऊन परत हातपायला पाणी लावले . शाळेची कपडे घातली . कपडे पण मागच्याच वर्षीची म्हणून थोडी आपरीच होती कारण नानांनी आजून नवीन शाळेची कपडे आणलीच नव्हती . आण्णा आता आठवीत गेले होते . गावात फक्त सातवी पर्यंत शाळा होती आठवीला तालुक्याच्या गावी जावे लागे पण तालुक्याचे ठिकाण जवळ असल्याने त्याची काही अडचण नव्हती . वर्गात पहिला नंबर म्हणून हायस्कूलच्या सरांनी परस्पर दाखले काढून नेऊन अडमिशन केलेले . अभ्यासाची मनापासून आवड असणाऱ्या आण्णांनी कधी पहिला नंबर सोडला नव्हता . घरातील मोठा मुलगा म्हणून घराची रानातली बरीच कामे त्यांनाच करावी लागत . पण कुरकुर नव्हती आणि नानांपुढे कुरकुर करायची बिशाद पण नव्हती . नाना चिडले की ओल्या कावळीचा फोक करून पोटऱ्या रक्ताळतील तोवर सटकावत राहायचे . भीतीपोटी अवाक्षर काढायची कुणाची हिम्मत नव्हती . नाना अंघोळ देवपूजा आटोपून स्वयंपाकाच्या घरातून चहा घेत आण्णांची धावपळ बघत होते . काही ठाम निश्चय मनात ठेवून नाना गरजले , “आण्णा ssss” धावतच आण्णा नानांच्या पुढ्यात येऊन उभे राहिले धपापत्या छातीने “काय नाना ?” “काय ...क्या करतो ओ म्हण .” नाना चढ्या आवाजात गरजले . “ओ नाना” खाली मान घालून आण्णा . “पहिले आणि शेवटचे सांगतो आजपासून शाळा बंद . घरच्या मालकाने शाळा शिकायची मग गड्यांकडून काम कोण करून घेणार ? आजपासून मळ्यातलं सगळं काम तु बघायचं . तु कर आणि गड्यांकून करून पण घे . आता आपारी चड्डी काढून धोतर नेसायचं .” इतके सांगून नाना निघून गेले . आण्णा मात्र तिथंच गपकन खाली बसले .त्यांच्या सर्व स्वप्नांवर पाणी पडले होते . आता एकच गोष्ट शिल्लक होती बैलाप्रमाणे मरमर राबणे . डोळ्यातून अखंड पाणी वाहत राहिले … आईने मायेने पाठीहून हात फिरवला पण तीही बापडी तेव्हड्याच कृतीची धनी होती . पुढे अवाक्षर बोलायची तिची पण हिम्मत नव्हती . आण्णांनी दिवसभर अन्नाचा कण पोटात ढकलला नाही की घोटभर पाणी . पूर्ण दिवस रडत एका कोपऱ्यात बसून राहिले आण्णा . दुसरा दिवस पण तसाच गेला . मग मात्र रात्री नानांनी स्वताहून अण्णांना जेऊ घातले . त्यांचे प्रेम कळत होते अण्णांना , पण त्यांचे प्रेम त्यांचे विचार बदलू शकत नव्हते हेही अण्णांना तितकेच माहित होते . तीन चार दिवसांनी आण्णा कामाला लागले . धोतर नेसता येईना तर नानांनी स्वतः मदत केली आणि शिकवले . बरोबरची मुले शाळेत जाताना अण्णांना अतीव दु:ख होई परंतु त्यांचा इलाज नव्हता . एके दिवशी दुपारी अण्णांचे हायस्कूलचे एक शिक्षक नानांकडे आले . अण्णांच्या आशा थोड्या पल्लवीत झाल्या . सावंत सर हे विज्ञानाचे शिक्षक , शिकवताना अगदी समरसून शिकवायचे आणि या आठवीच्या वर्गातील आण्णा हे त्यांचे आवडते विध्यार्थी बनले होते अगदी महिनाभरात . सावंत सर पूर्ण जाणून होते की खरंच अश्या विद्यार्थ्यांची गरज आहे शाळेला . सावंत सर एकेक दिवशी रंगांबद्दल शिकवत होते . सर्व सांगून झाल्यावर कुणाच्या शंका आहेत का म्हणून सरांनी विचारले . तर अण्णांनी एक प्रश्न विचारलेला त्यांना ,”सर , उन वाढले की काळ्या रंगाचे प्राणीच का पाण्यात बसतात पांढरे का नाही ?” त्या वेळी त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही पण नंतर अभ्यास करून त्यांनी सांगितले , “ काळा रंग हा उष्णता शोषून घेतो म्हणून उन्हात या प्राण्यांना उष्णता जास्त जाणवते आणि ती काहिली कमी होण्यासाठी ते पाण्याचा आधार घेतात .” त्या वेळी असे प्रश्न म्हणजे खूप चांगली बौद्धिक पातळी असेच सरांचे समीकरण होते . आणि अश्या हुशार विद्यार्थ्याला गमवायचे नव्हते सावंत सरांना . म्हणून नानांचा स्वभाव माहित असूनही ते त्यांना समजावण्यासाठी आले होते . “नमस्कार नाना .” सर नानांना नमस्कार करून शेजारी बसले . तोवर ताईने सरांना पाणी आणून दिले . “नमस्कार सर , का येणं केलंत , काही काम निघाले का ?” असे विचारले खरे पण नानाही जाणून होते सर येण्याचे कारण “नाही , नाही काम तसे विशेष पण …” अडखळत सर बोलले . “पण काय सर स्पष्ट बोला .” “ त्याचे असे आहे तुमचा आण्णा अभ्यासात हुशार आहे , दहावी पर्यंत शिकवले त्याला तर बरे होईन .”घाईने बोलत सरांनी त्यांचे बोलणे पूर्ण केले . “ते झाले तुमचे सर , बरे होईन हे मला पण कळते . पण आमची अडचण आहे . मी जर आण्णाला शिकवले तर तो अंगाला शेण तर लागून घेईन का ? आमचा शेतकरी धर्म आणि इतकी शेती करायची कोणी हो आमच्या मागे ?” प्रश्नार्थक मुद्रेने नाना सरांना म्हणाले . “ते सर्व खरे आहे पण पोराला शिकायची खूप हौस आहे.” “प्रत्येकाची प्रत्येक हौस पूर्ण करणे शक्य नसते सर , आणि शिकून काय मिळणार ? त्यापेक्षा त्याला शेत जास्त पैसा देईन .” या उत्तरावर सर नक्की निरुत्तर होणार याची खात्री होती नानांना . सरांना कळून चुकले आभाळाला कितीही दगड मारले तरी आभाळ थोडेच खाली येईल ...नानांच्या निग्रहापुढे सरांचे पण काही चालले नाही . चहा घेऊन सरही चालते झाले . आण्णांची मात्र होती नव्हती ती सर्व आशा मावळली . मघाशी सर आले तेंव्हा अपेक्षांची उंचावलेली मान पुन्हा नजर जमिनीत खुपसून खाली झाली . शिकण्याची हौस मात्र होती तशीच गाळ विहिरीच्या तळाला जाऊन बसावा तशी मनाच्या तळाला लागली . भरते आले की कधी कधी डोळ्यातून वाहण्यासाठी …. आजही तशीच भरती आली होती मनाला . आज त्यांची मुले मोठी झाली तरी वर्चस्व मात्र नानांचे होते . ते फक्त कामाचे धनी बाकी सर्व नानांकडे . ज्योतिही आण्णानसारखी शिकण्यासाठी आसुसलेली . स्वताचा ठसा समाजात उमटवण्याची इच्छा उराशी बाळगून . आण्णांना तिची तगमग उमजत होती पण काही बोलत नव्हते ते . ती पास होणार तेही चांगल्या मार्कांनी यात तसूभरही शंका नव्हती त्यांना पण पुढे काय ? हा यक्षप्रश्न होता . तिचे माझ्यासारखे होईन की होतील तिची स्वप्ने साकार ? लेकरांच्या समाधानात आईबापाचा स्वर्ग असतो पण लेकरू उदास तर कसे होणार ? समोरच्या ढेकळात एक रोप उगवेल ही अपेक्षा किती निरर्थक आहे ? पण स्वप्ने असतील तर माणूस आहे , नसतील तर त्याचे जीवन तिथेच पूर्णविराम घेते . आणि कुणी म्हटले पण आहे ‘आशेवर जग जगते’ या आशेतून चांगल्या गोष्टींची बीजे तयार होतात, पुन्हा उगवण्यासाठी … आज आण्णांनी या कोंडीला तोंड फोडायचे ठरवले , पण त्यांनी हेही ठरवले की आधी ज्योतीची तळमळ पाहायची , तिने एक पाउल टाकले की तिला आधार द्यायचा . या विचाराने आण्णांचे मन प्रसन्न झाले आणि त्या काळ्या ढेकळांच्या कानव्हास वर ती हिरवी झाडे जास्तच हिरवी दिसू लागली , त्यांच्यासारखी मनालाही पालवी फुटली होती ...स्वप्नांची … लांबून पळत येत असलेली ज्योती दिसली , ढेकळांना न जुमानता ती धावत होती . धापा टाकत ती आण्णांच्या जवळ आली पण तिच्या तोंडून शब्द फुटेना , फक्त हसत होती . निकाल चांगला लागला हे आण्णांनी ताडले . “आण्णा मला न ८० % मार्क मिळाले .” हसत , धापा टाकत ती कसेतरी बोलली . वाकून आण्णांच्या पायाला तिने स्पर्श केला . “शाब्बास बाळा छान झाले , बस आता इथे .”शेजारी बोट दाखवत आण्णा बोलले . “काय ?” शेजारी बसत ज्योती विचारू लागली . “आता काय करायचे पुढे ?” अचानक आलेल्या प्रश्नाने ज्योती भांबावली पण क्षणात तिची कळी खुलली आणि उत्साहाने ती सांगू लागली . “आण्णा , मला न , मला डॉक्टर व्हायचंय..आणि मला मार्क पण चांगले आहेत न आता.” आण्णांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली , आज आपली ही पोर नक्की आपले स्वप्न सत्यात आणणार . मी कितीही कष्ट करीन पण हिला काही कमी पडू देणार नाही . स्वप्नांचे मनोरे पुन्हा उभे राहिले पण नानांची आठवण येताच मन उदास झाले . आण्णा काही उत्तर देत नाही म्हटल्यावर , ज्योती पाहत राहिली त्यांच्याकडे . माझे काही चुकले का असे विचारावे वाटले . पण आधी उत्साही आणि नंतर गढूळ झालेला आण्णांचा चेहरा पाहून ती शांत झाली . “ज्योतीबाई सगळे ठीक आहे पण नाना शिकू देतील का ? त्यात त्यांनी आत्याला सांगितले आहे आमची नात सुनबाई करायची आहे म्हणून . मग आता लग्नाची घाई करतील .” आण्णांना तिच्या मनाचा ठाव घ्यायचा होता. “आण्णा तुम्हाला काय वाटते सांगा न ? मी नानांना समजावणार आहे , मी नाही स्वताची स्वप्ने धुळीला मिळताना पाहू शकणार .तुमची इच्छा सांगा फक्त .” ज्योती पोटतिडकीने बोलत होती,”आणि नाना किती लाड करतात बरे माझे ? मग नाही म्हणणार नाहीत मला .” “लाड वेगळे आणि शिकवणे वेगळे असते ज्योती .” तिला समजावत आण्णा म्हणाले . “पण आण्णा तुमची तर इच्छा आहे न ?” “हो .” “मग तुम्हीच सांगा न नानांना .” “आधी तु सांग मग बघू .” आण्णा फक्त बघू म्हटले पण ज्योतीचे मन आनंदाने भरून आले . पुढे काही होवो पण आण्णा माझ्या सोबत आहेत इतकेच मला पुरेशे आहे , मनाशीच बोलली ती ! “आण्णा एक विचारू ?” “हो , विचार की .” “मी का सांगू आधी तशी पण वेलीला झाडाच्या आधाराची गरज असतेच ना ?” “हो पोरी पण जी वेल आधाराशिवाय वाढते न तीचा बुंधा मोठा होतो आणि तो एकटाच त्या वेलीचे ओझे उचलायला समर्थ बनतो . मग जरी झाड करपून गेले तरी वेल करपत नाही . ती वाढतच राहते , आभाळाकडे …”आण्णांच्या डोळ्यात पाणी तरळत होते . “आण्णा sssss”अति आनंदाने ज्योती उद्गारली . आज तिला खूप अभिमान वाटला आण्णांची लेक असल्याचा. आणि मनोमन तिने ठरवले त्यांना पण अभिमान वाटेल मला मुलगी म्हणताना असेच काही नक्की करणार मी ! एका अनोख्या तेजाने तिचे डोळे चकाकत होते … रात्री जेवण उरकल्यावर ज्योतीने नानांना विचारलेच . “नाना आता मला पुढे पण शिकायचे , डॉक्टर व्हायचे , आता आठ दहा दिवसात अडमिशन चालू होतील .” असे बोलत होती जणू एखादे चॉकलेट मागत आहे . तिचे ते निरागस बोलणे ऐकून आधी नाना हसले , नंतर गंभीर होत म्हणाले , “ आता बास शिकणे आत्याच्या पोराला नोकरी लागली आता लग्न ठरवू आणि दिवाळीत उरकून टाकू .” “नाना एक विचारू ?” “हा विचार .” “तुमचं सुख कश्यात आहे ?” “म्हणजे ?” “तुम्हाला आनंद कधी वाटतो ?” “पोरांना आनंदात बघून .” हसुन नाना बोलले . ज्योतीला अपेक्षित उत्तर मिळाल्याने आणखी बरे वाटले . “ मग विचार करा मी सुखी तर आण्णा , आणि आण्णा सुखी तर तुम्ही . पण मला तुम्ही किती मोठा श्रीमंत नवरा दिला तरी माझा आनंद माझ्या पुऱ्या होणाऱ्या स्वप्नात आहे . आणि बळजोरीने तुम्ही माझे लग्न केले तरी मी नाराज असल्याने बाकीच्यांना त्रासच देणार . म्हणजे एकासोबत दोन आयुष्य खराब .” आता नाना गप्प झाले , लाडकी नात होती ज्योती म्हणून ऐकून घेत होते आणि विचार करीत होते . आडकीत्याखाली सुपारी खांडलीत नाना निग्रहाने बोलले ,”पण आता पाहुण्याला शब्द दिला .” “पाहुणे आपलेच आहेत ना नाना , आणि एक सांगू का ?” शेवटचे अस्र काढत ज्योती पुढे बोलू लागली , “आम्हाला जीवशास्त्र पुस्तकात सांगितले आहे , एकाच नात्यातील मुलांत गुणसूत्रे सारखी असल्या कारणाने त्यांना होणारी संतती ही जन्मजात दोष असणारी असते . किंवा काहीवेळा मतिमंद होते . हे कारण तुम्हाला आणि त्यांना पुरेसे नाही का ?” “असे पुस्तकात आहे ?” “हो नाना , आणि असे वेळोवेळी सिद्ध पण झालेय .” “बर ठीक आहे , त्यांना सांगू समजावून , पण शिकणे नको .” “आता का नको ?” पाय आपटीत रडक्या सुरात ज्योती विचारू लागली . “शिकता शिकता तु मोठी होणार , तुझ्या लायक नवरा कसा बघायचा ?” चिडवायच्या हेतूने गालात हसत नाना बोलले . “असे का म्हणता नाना ? इतकी पण मोठी नाही होणार मी , आणि शेवटच्या वर्षाला गेले न डॉक्टरकीच्या मग केले लग्न तरी चालेन.” “बर बघू आण्णाला विचारतो .” “माझी काही हरकत नाही नाना तिला वाटतेय तर शिकू देत .”आण्णा बाहेर येत बोलले . आता दोन मजली हसत नाना बोलले , “आरं अशी शाळा आहे तर तुम्हा बापलेकीची?बर बर असू देत .. शिकू द्या .. तुमचं अपूर्ण राहिलं तिच् पूर्ण करू .” ज्योती दोघांच्या पाया पडून पळत आजीला जाऊन बिलगली . आण्णांच्या डोळ्यात पाणी होते . मनाला भरते आले होते पण आज आनंदाने …...

2 comments: