या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Monday 23 March 2020

कोणता रंग..

कोणता रंग आज उधळू मी ?
खरच सुचत नाहीये मला ...

हिरवा हाती घेतला आणि
मी असहिष्णू ठरलो
देशाभिमानी वर्णियांनी
माझी जात विचारली ....

मी स्वतः ला माफ केलं ...।

भगव्या रंगात हात घालणार,
इतक्यात रस्त्यावरून, ईमारतीवरून
माझ्यातला हिटलर मला दिसला
माझ्याक्रुरतेचा रंग माध्यमातून दाखविला ...

मी स्वतः ला माफ केलं ...।

पिवळ्या आणि निळ्याकडे नुसतं पाहीलं तरी,
माझ्या डोळ्यातील रंगच उडाले.
इकडचे पुण्यश्लोक 
तिकडचे बाबासाहेब गोंधळात पडले..

 मी स्वतः ला माफ केलं ...।

काय करू मी,कसं वागू ?
रंग कोणता निवडू मी ?
हिरवा आता शेवाळलाय
भगवा तर दाहकच झालाय ...।

सापडलाच माझा रंग तर
कळवा मला ..
पुन्हा धाडस करेन मी,
तो ही रंग उचलण्याच !!

कारण स्वतः ला माफ करण्याची 
आता सवय झालीय ...।

-सुजीत अडसूळ.
23/03/2016.

Wednesday 2 August 2017

"मैत्री"

मैत्री तुझी -माझी,
         जशी गाठ रेशमाची।
कधी ना सुटायची,
कधी ना तुटायची।।

मैत्री तुझी -माझी,
      जशी पालवी चैत्राची।
बहर पाहुनी ऐकू येते जशी,
        साद कोकिळेची।।

मैत्री तुझी-माझी,
   जशी तलखी वैशाखाची
 कधी रुसव्यांची
तर कधी फुगव्यांची।।

मैत्री तुझी-माझी,
जशी कुपी सुगंधाची।
एकत्र घालवलेल्या  क्षणांची
 अन् पाहिलेल्या स्वप्नांची।।

मैत्री तुझी-माझी,
   जशी शीतलता चंदनाची।
स्वतः  झिजूनी इतरांना।        
 सुगंध देण्याची।।

मैत्री तुझी-माझी,
       अशी लाख मोलाची।
कधी ना सुटायची,
        कधी ना तुटायची।।
डॉ.सीमा कुलकर्णी -देशपांडे.

Monday 17 April 2017

वाट तुझी

भास - आभासांचे धुसर धुके,
त्यात तुला शोधण्याचे,
माझे प्रयत्न फुके।
आठवणींच्या नभांची गर्दी
होता दाट..
हाती नसते काही, फक्त पाहाणे तुझीच वाट।।

त्या वाटांचे नीरव-रीतेपण,
वाढवी मज ह्यदयीचे ठोके।
तुझ्या नसण्याच्या जाणिवेने,
आज सारे जगचं वाटे ओकेबोके।।
आठवणींच्या तरुंची गर्दी होता दाट..
हाती नसते काही, फक्त पाहाणे तुझीच वाट।।

त्या तरू- छायेखाली, ठेवूनी
तव खांद्यावर डोके।
स्वप्नवत वाटे सारे, सांगू कसे
माझे शब्द ही पडती फिके।।
आठवणींच्या पक्षांची गर्दी होता दाट..
हाती नसते काही फक्त पाहाणे तुझीच वाट।।

त्या पक्षांनी घेता उंच भरारी,
गर्द नभांची दाटी फाके।
अन् निळ्या गगनावरती,
स्वप्नांचे इंद्रधनू वाके।
आठवणींच्या सप्तरंगांची गर्दी
होता दाट...
'तू'दिसलास मला पाहताना,
'माझीच' वाट।।

डॉ.सीमा कुलकर्णी-देशपांडे.

Friday 10 March 2017

नारी

सप्तसूरांच्या लहरींमधूनी सूर गवसला परी।
  नारी तू सर्वां तारी,
   नारी तू सर्वां तारी।।

माया, ममता, वात्सल्याचा पान्हा घेऊनी उरी।
मातृत्वाचा भार पेलूनी,
तू सर्वां तारी,
नारी तू सर्वां तारी।।

माता,भगिनी,वहिनी,प्रिया
यांची तूच मूर्ती खरी।
बाळबोध संस्कारांची अन् प्रितीची दिलीस तू शिदोरी।
नारी तू सर्वां तारी..
नारी तू सर्वां तारी।।

तूच सीता,तूच द्रौपदी,तूच तारा अन् मंदोदरी।
तूच लक्ष्मी ,तूच अहिल्या,अन् जिजाई।
जशी हिरकणी बुरूजावरी।।
नारी तू सर्वां तारी..
नारी तू सर्वां तारी।।

शील,सत्व, शालिनतेची अन् शौर्याची गाथा तुझी न्यारी।
सांगती सप्तसूरांच्या लहरी।।
नारी तू सर्वां तारी...
नारी तू सर्वां तारी।।
    डॉ सीमा कुलकर्णी देशपांडे .

Monday 30 January 2017

भास तुझा

रम्य सकाळ ती श्रावणी,
सोमवारची।
  समोर पिंडी शिवाची..
अन् मागे वळूनी पाहता,
होतो भास तुझाची।।

त्या भासांचे अर्थ लाविता,
होते वेळ दुपारची।
अन् 'मृगजळा' मागे धावता..
होतो भास तुझाची।।

'मृगजळचं'ते लोप पावता,
होते कातरवेळची।
अन् संधिप्रकाशी नजर रोखता..
होतो भास तुझाची।।

'नजरचे'ते खेळ उमगता,
नकळत होते रात्र विरहाची।
अन् सावल्यांचे खेळ पाहता..
होतो भास तुझाची।।

'स्वप्नांची' दुनिया संपता,
पुन्हा आशा नव्या पहाटेची।
समोर पिंडी शिवाची..
अन् मनी आस फक्त
तुझ्या अस्तित्वाची।।
     डॉ सीमा कुलकर्णी देशपांडे 

Thursday 19 January 2017

नि:शब्द

गुढ मनाच्या डोहावरती,
नि:शब्द तरंग उठती।
मुके भाव लोचनातूनी,
अश्रूंची शब्द फुले झरती।
जरी नि:शब्द 'तू'अन् नि:शब्द 'मी'।।

गत आठवणींच्या हिंदोळयावरती,
आभासांचे झोके चढती।
मुके भाव अंतरातूनी
मज ह्यदय स्पंदने बोलती।
जरी नि:शब्द 'तू 'अन् नि:शब्द' 'मी'||

तुज मुरलीच्या सादांवरती,
मज आर्त प्रतिसाद उठती,
मुके भाव मीरेच्या देहातूनी,
जहर होऊनी भिनती।
जरी नि:शब्द तू अन् नि:शब्द 'मी'

तुज श्वासांच्या लहरींवरती,
मज श्वासांच्या नौका विहरती।
मुके भाव माझ्या मनातूनी
जणू तुझे श्वासचं बोलती।
जरी नि:शब्द 'तू 'अन् नि:शब्द 'मी'||
   डॉ सीमा कुलकर्णी देशपांडे

Tuesday 22 March 2016

सुरुवातीचे दिवस

बेबंदाला बेधुंदीची जोड मिळाली होती
पायबंदी कोड्याचीही फोड कळाली होती
मस्तमौला बेफिकीर सुरावटीचे दिवस
खूपच होते निर्ढावलेले सुरवातीचे दिवस

अधांतरी अंतर्मनी हेलकावे हिंदोळ्याचे
उचंबळ लोळाचा दमनशमन कल्लोळाचे
डोळ्यांमधे जागणा-या सांजवातीचे दिवस
खूपच होते गंधाळलेले सुरुवातीचे दिवस

डोळे झाकून रोज चाले विस्तवाशी खेळ
बसत नव्हता स्वप्नांचाही वास्तवाशी मेळ
समई समजून निरंजनी फुलवातीचे दिवस
खूपच होते वेडावलेले सुरुवातीचे दिवस

आनंदाच्या फांदीवरती टांगून गेले झुला
मुग्धतेचा अर्थ खरा सांगून गेले मला
ऊर्मी गुर्मी रोज नव्या रुजवातीचे दिवस
खूपच होते लाडावलेले सुरुवातीचे दिवस

ओथंबलेल्या घनांना अडविल का कोणी
हुंदके त्यांचे अडकलेले सोडविल का कोणी
साचेबंदी नाकेबंदी आले वहीवाटीचे दिवस
फिरुन पुन्हा येतील का सुरुवातीचे दिवस ?

      ....डॉ. शिवाजी काळे.