लुप्तक्षणांचे मी मंथन करीतो
उद्विग्न होऊनी सयतटावरी
कृष्णबाहुल्यांचा नाच तो बघतो
स्वपराभवाच्या भयपटावरी
मम अंतरीच्या मंथनामधूनी
प्राप्तरत्नांचे मी पूजन करीतो
विगतकालाच्या समिधा अर्पूनी
नवयज्ञाचे मी सृजन करीतो
भाव्यसमराचा शंख निनादतो
आव्हान मिळता मम अस्तित्वाला
औदासिन्याची मी आहुतीच देतो
प्रज्वल करुनी त्या उज्वल ज्वाला
विजितस्वप्नांचे अमृत प्राशूनी
या अश्वमेधाचा अश्व उधळतो
तावूनी निघता अग्निदिव्यातूनी
भविष्यकाळाचे विश्व उजळतो
मम अतिताच्या प्राक्तनास मी
पायदळी छिन्न तुडविल्यावरी
पुनःश्च आतुर आरुढण्यास मी
दुभंगित माझ्या स्वप्नकड्यावरी
...डॉ. शिवाजी काळे.
अप्रतिम रचना शिवाजी .. हरलेल्या मनाला प्रेरणा देणारी ... तुझ्याजवळील शब्दांच्या आगारातील योग्य शब्दांची गुंफण करून एक प्रेरणादायी काव्यनिर्मिती केलीस . तुझ्या काव्यप्रतिभेबद्दल काय बोलावे ...
ReplyDelete