या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Friday 20 March 2015

तदात्मनः सृजाम्यहम् ?

कुरूक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगताना
तूच तर ग्वाही दिली होतीस ना
भारतवर्षाच्या रक्षणाची?
मग कुठे आहेस तू आता,
आणि कुठेय तुझा अवतार?
कि संपलास तुही यदुकुळाबरोबरच?
कि फक्त अंगठ्यातच होते तुझे प्राण?
दिसतेय का यादवी माजलेली तुला?
आणि शकुनींच्या कारवाया?
कंसाची मजल तर
गर्भापर्यंत गेलीय आता...!
पुतनामावश्या बहुराष्ट्रीय झाल्यात
आणि बाळकृष्णांना विष पाजतायत!
आजच्या द्रौपदींचा आवाज
पोहोचतोय का तुझ्यापर्यंत?
सोळा हजारजणींना आश्रय दिलास ना तू
मग आज हजारातल्या सोळा तरी
आहेत का सुरक्षित?
का सोडलीस रे कलीयुगाची साथ?
गल्लोगल्लीचे अर्जुन भटकतायत
मोडलेली धनुष्ये घेऊन!
कुठे  गेला  तुझा कर्मयोग आता ?
सुदामा एकटाच खातोय पोहे
खोलीच्या कोपऱ्यात बसून,
कालसर्पाच्या मस्तकावर
तू कधी नाचतोयस
याची वाट बघत!
आणि राधा तर काय
शोधतेय तुझा अंश
बुवाबापूंच्या आश्रमात !
तू स्वतःला विश्वरुप समजतोस ना?
भारताला ग्लानी आल्यावर
प्रकटणार होतास,
मग कशाची वाट पाहतोयस?
कि तेवढी ताकद नाही
तुझ्या करंगळीत आता
गोवर्धन उचलण्याएवढी.....?

                      ------- डॉ.शिवाजी काळे.

4 comments: