या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Tuesday 17 March 2015

मन


       माणसाचं मन फार विचित्र असतं. कधीकधी मनाचंही कशातच मन लागत नाही. मग चंचल मन सुस्त पडतं, पंख छाटलेल्या गरुडासारखं....!
       मग उगाचच गतकाळाच्या पुस्तकाची पानं उलटत राहावंसं त्याला वाटतं. त्या पुस्तकाची अवस्था तर मनाहूनही विचित्र असते . त्याची पाने तरी कुठे सारखी असतात ? पुस्तक असूनही वेडंवाकडं....
      काही पानं अगदी स्वच्छ तर काही डागाळलेली.....कसल्यातरी पाण्यानं.....कडेनं मीठ फुटल्यासारखी! तर काही रंगीबेरंगी , पाहताच डोळ्यांत चमक आणणारी .काही कोरी करकरीत , तर काही फाटलेली , दुमडलेली, चुरगळलेली. काही पानं तर मुद्दामच एकमेकांना चिकटवून ठेवलेली ....थोडासा मजकूर चुकल्यासारखी . एखाद्या पानावरचा मजकूर सजवलेला...त्यावर चमक टाकलेली...उठून दिसावं म्हणून ..!
       पुस्तक पाहता पाहताच मनाचं मन थोडंसं हलकं होतं. त्याला पंख फुटू लागतात, उंच उंच उडावंसं वाटतं, ते पुस्तक फेकून द्यावंसं वाटतं ...
....पण मनाचे पंख फडफडताच पुस्तकाची पानंही फडफडतात. मनाचा पिच्छा ते पुस्तक काही सोडत नाही.
     मग मन त्या पुस्तकाला बरोबरच घेऊन फिरतं. त्याला सजवण्याचा, सुंदर करण्याचा प्रयत्न करतं. पण पुस्तकाची पानं मात्र रोज वाढतच असतात . त्यामुळे मनाचा भार हलका होण्याऐवजी वाढतच जातो. तो भार सांभाळता सांभाळता मन थकतं, दमून जातं...
        मग तो भार हलका करण्यासाठी ते दुसऱ्या एखाद्या मनाला मदत मागतं. यामुळे काही मनांचा भार हलका होतोही ......पण.......कधीकधी त्या दुसऱ्या मनाचाच भार पेलण्याची पाळी येते ...
........मग मात्र मन हताश होतं. त्याला त्या पुस्तकाचा राग येतो......ते दूर निघून जातं.....एखाद्या हलक्या मनापाशी....जेथे पानांची फडाफड अजीबात ऐकू येणार नाही अशा ठिकाणी ....!!!
        --------------------डॉ. शिवाजी काळे.

2 comments:

  1. ते दूर निघून जातं.....एखाद्या हलक्या मनापाशी....जेथे पानांची फडाफड अजीबात ऐकू येणार नाही अशा ठिकाणी ....!!!
    मस्तच रे शिवाजी !

    ReplyDelete
  2. Kharach man athang aahe Shivaji

    ReplyDelete