Tuesday, 31 March 2015
स्वप्न
Saturday, 28 March 2015
कोडी न सुटलेली...
ब्रम्हांड घेईन कवेत मी
वल्गना बहु करीत होतो
हसतेय का मुठीतून मज
...रेती सांडलेली !
लिलया पेलीन धनुष्य मी
आव अर्जुनाचा आणित होतो
हास्य कुत्सित करतेय का
...प्रत्यंचा तुटलेली !
शिखर गाठलेच होते मी
आणि आरुढ होणार होतो
सांत्वनास आली मज हाती
...दोरी सुटलेली !
दुःखात वितळेन कसा मी
स्थितप्रज्ञ भासवित होतो
दगाबाज झालीच कशी ती
...लाली नेत्रातली !
परीपूर्ण जगलो जीवन मी
मनास समजावीत होतो
वाकुल्या मग का दाखविती
...कोडी न सुटलेली !
---डॉ. शिवाजी काळे.
Wednesday, 25 March 2015
....माझी लेक...
माझी लेक
तुझ्या येण्याने
आयुष्य फळाला आले
माझ्या जन्माचे
तर सार्थक झाले.
तुझ्या बाल - लिला पाहून
नकळत आम्ही सुखावलो
तुझ्या बरोबर आयुष्य
भरभरून जगू लागलो.
तुझं हासणं - खेेळणं
जणू हर्षाची आठवण
तुझं रागावणं - रुसणं
जणू आनंदाची साठवण.
आई म्हणून येतेस
जेव्हा कुशीत
स्वर्गसूख मिळते
तुझ्या मिठीत
बाबा - बाबा म्हणत
अधिकार गाजवतेस
अन् पटकन त्याच्या
मिठीत सुखावतेस.
यश, सुख समृद्धि आनंद
सारे काही मिळावे तुला
तू सर्वांच्या शिखरि असताना
पाहत रहावे, आभा फक्त तूला
- तुझी आई
४/३/१५
Tuesday, 24 March 2015
वेदना
बहर
आठवणींना बहर येतो..
दिनरातीच्या मिलनाने
जणू काळोखही मुग्ध होतो
.....वादळ मनीचे.....
..........वादळ मनीचे........
सखे, नुसतच तुझं
शून्यात पाहणं...
विचारांच्या कोलाहलात
गोंधळून जाणं...
निर्विकार चेहऱ्यामागचे
दुःख लपविणं...
अखंड बडबड सोडून
फक्त अबोल राहणं...
मनीच्या सर्व भावना
मनातच लपवणं...
ओसांडणाऱ्या आश्नूंना
थोपविण्याचा यत्न करणं...
रुद्ध झालेल्या स्वराला
कोमलतेचा साज देणं...
वर-वर शांत राहत
मनीच्या ज्वालामुखीत जळणं...
जीवनरूपी लढाईत
असं मनाला मारणं...
का गं, दुर्मिळ झालं
तुझं खळखळून हासणं...
------डॉ माधुरी-----
आठवण
संधिप्रकाश पांघरुनी
मुग्ध संगीत निर्मिते
मम हृदयीच्या तारा
तुझी आठवण छेडीते..!
Sunday, 22 March 2015
उर्मिला
गुन्हा काय घडला प्रभु मज हातुनी
कधी सांगशील काय रे रामा मजला
स्वगृहीच मी जाहले का वनवासीनी
तव बंधुभक्त लक्ष्मणाची मी उर्मिला
भरजरी लेऊनी करु काय गे सीते
विरक्त झालीस जरी भ्रतार साथीला
प्राक्तनात तुझीया होतीच ती वल्कले
परि मी का कवटाळू मम विरहाला
अनुराग तुजला रे समजावा कैसा
प्रभक्ता तू तर ब्रम्हचारी हनुमंता
आस पतीचरणांची ही काही लपेना
विटून गेले आता या भयाण एकांता
आनंद आसुरी तुजला माये कैकेयी
बलीदान मम संसारा तव मनोरथा
प्रश्न हा पडे मजला या प्रतिक्षेतही
हीच का तुझी वचनपूर्ती दशरथा
भ्राता जीवाहून प्रिय असेल तुजला
प्राण कायीचा या तुच की रे लक्ष्मणा
विरहीणी दारात उभी तुझी उर्मिला
समजावू कशी या व्याकुळल्या मना
---डॉ. शिवाजी काळे.
प्रेम तू...
..... प्रेम तू .....
यातना सहन करत
आनंदी भाविष्याची वाट बघणाऱ्या
देवकीमातेचे, अव्यक्त प्रेम तू......
हर्षाने बाल-लिला बघत
ब्रम्हांडाचे दर्शन घडालेल्या
यशोदेचे वात्सल्यरुपी प्रेम तू......
इतिहासाची साक्ष असणाऱ्या
तव दर्शनासाठी आतुरलेल्या
गोप गोपिकांचे निरागस प्रेम तू.....
स्वलहरींनी सकल आसमंत
नकळत मंञमुग्ध करणाऱ्या
वेणूचे नादरूपी प्रेम तू.....
राव रंक भेद मिटवून
तव दर्शने तृप्त होणाऱ्या
सुदाम्याचे मिञ रुपी प्रेम तू.....
नियतीने क्रूर थट्टा मांडलेल्या
सहनशील अन् दृढनिश्चयी
पांचालीचे दृढ बंधू प्रेम तू......
रणांगणावर शस्त्र टाकणाऱ्या
कुंतीपूञ महापराक्रमी पार्थाचे
पथदर्शक मिञ प्रेम तू.......
जगताला निखळ प्रेमाची
साक्ष पटवून देणाऱ्या
राधेचे अमर प्रेम तू......
प्रेम आणि प्रेमच तू......
--------डॉ माधुरी ------
Friday, 20 March 2015
तदात्मनः सृजाम्यहम् ?
कुरूक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगताना
तूच तर ग्वाही दिली होतीस ना
भारतवर्षाच्या रक्षणाची?
मग कुठे आहेस तू आता,
आणि कुठेय तुझा अवतार?
कि संपलास तुही यदुकुळाबरोबरच?
कि फक्त अंगठ्यातच होते तुझे प्राण?
दिसतेय का यादवी माजलेली तुला?
आणि शकुनींच्या कारवाया?
कंसाची मजल तर
गर्भापर्यंत गेलीय आता...!
पुतनामावश्या बहुराष्ट्रीय झाल्यात
आणि बाळकृष्णांना विष पाजतायत!
आजच्या द्रौपदींचा आवाज
पोहोचतोय का तुझ्यापर्यंत?
सोळा हजारजणींना आश्रय दिलास ना तू
मग आज हजारातल्या सोळा तरी
आहेत का सुरक्षित?
का सोडलीस रे कलीयुगाची साथ?
गल्लोगल्लीचे अर्जुन भटकतायत
मोडलेली धनुष्ये घेऊन!
कुठे गेला तुझा कर्मयोग आता ?
सुदामा एकटाच खातोय पोहे
खोलीच्या कोपऱ्यात बसून,
कालसर्पाच्या मस्तकावर
तू कधी नाचतोयस
याची वाट बघत!
आणि राधा तर काय
शोधतेय तुझा अंश
बुवाबापूंच्या आश्रमात !
तू स्वतःला विश्वरुप समजतोस ना?
भारताला ग्लानी आल्यावर
प्रकटणार होतास,
मग कशाची वाट पाहतोयस?
कि तेवढी ताकद नाही
तुझ्या करंगळीत आता
गोवर्धन उचलण्याएवढी.....?
------- डॉ.शिवाजी काळे.
..........तू.........
..............तू............
मातेच्या गर्भातला श्वास
पित्याचा सार्थ आभिमान तू
बाहेरच्या अजाण जगाला
जाण, नवनवेली तू.....
अनेक दिशा समोर तुझ्या
वाट योग्य आंगिकार तू
अन् पंख प्रगतिचे लावून
. हो, नवचैतन्या तू......
सौंदर्य, बुद्धि अन् धैर्याचे
मूर्तिमंत उदाहरण तू
स्वसंरक्षणासाठी हो सिद्ध
शौर्या अन् सामर्थ्या तू....
ईश्वराची सर्वोत्कृष्ठ निर्मिती
वात्सल्याची साक्षात मूर्ति तू
अन्याया विरूद्ध पूकार लढा
. .......... हो रणरागिनी तू...
... हो रणरागिनी तू......
________ डॉ. माधुरी .
Wednesday, 18 March 2015
आयुष्याचे गाणे
विरघळून जाई उजेड मग रात्रीत |
रे असेच असते दिवस रात्रीचे जाणे
सोबती आम्ही सारे, गातो आयुष्याचे गाणे ||
Tuesday, 17 March 2015
मन
माणसाचं मन फार विचित्र असतं. कधीकधी मनाचंही कशातच मन लागत नाही. मग चंचल मन सुस्त पडतं, पंख छाटलेल्या गरुडासारखं....!
मग उगाचच गतकाळाच्या पुस्तकाची पानं उलटत राहावंसं त्याला वाटतं. त्या पुस्तकाची अवस्था तर मनाहूनही विचित्र असते . त्याची पाने तरी कुठे सारखी असतात ? पुस्तक असूनही वेडंवाकडं....
काही पानं अगदी स्वच्छ तर काही डागाळलेली.....कसल्यातरी पाण्यानं.....कडेनं मीठ फुटल्यासारखी! तर काही रंगीबेरंगी , पाहताच डोळ्यांत चमक आणणारी .काही कोरी करकरीत , तर काही फाटलेली , दुमडलेली, चुरगळलेली. काही पानं तर मुद्दामच एकमेकांना चिकटवून ठेवलेली ....थोडासा मजकूर चुकल्यासारखी . एखाद्या पानावरचा मजकूर सजवलेला...त्यावर चमक टाकलेली...उठून दिसावं म्हणून ..!
पुस्तक पाहता पाहताच मनाचं मन थोडंसं हलकं होतं. त्याला पंख फुटू लागतात, उंच उंच उडावंसं वाटतं, ते पुस्तक फेकून द्यावंसं वाटतं ...
....पण मनाचे पंख फडफडताच पुस्तकाची पानंही फडफडतात. मनाचा पिच्छा ते पुस्तक काही सोडत नाही.
मग मन त्या पुस्तकाला बरोबरच घेऊन फिरतं. त्याला सजवण्याचा, सुंदर करण्याचा प्रयत्न करतं. पण पुस्तकाची पानं मात्र रोज वाढतच असतात . त्यामुळे मनाचा भार हलका होण्याऐवजी वाढतच जातो. तो भार सांभाळता सांभाळता मन थकतं, दमून जातं...
मग तो भार हलका करण्यासाठी ते दुसऱ्या एखाद्या मनाला मदत मागतं. यामुळे काही मनांचा भार हलका होतोही ......पण.......कधीकधी त्या दुसऱ्या मनाचाच भार पेलण्याची पाळी येते ...
........मग मात्र मन हताश होतं. त्याला त्या पुस्तकाचा राग येतो......ते दूर निघून जातं.....एखाद्या हलक्या मनापाशी....जेथे पानांची फडाफड अजीबात ऐकू येणार नाही अशा ठिकाणी ....!!!
--------------------डॉ. शिवाजी काळे.
Monday, 16 March 2015
फुले आणि शशी
Saturday, 14 March 2015
जीवनप्रवाह
जीवनाच्या प्रवाहात वाहताना
मी पिंपळपान झालो...
पाण्यामधे कुजून कुजून
जाळीदार नक्षी झालो !
जीवनाच्या प्रवाहात वाहताना
मी एक ओंडका झालो...
लाटांना धडका देत देत
निरंतर तरंगत राहीलो !
जीवनाच्या प्रवाहात वाहताना
मी उग्र प्रपात झालो...
खडकावर आदळून आपटून
शांत शांत नदी झालो !
जीवनाच्या प्रवाहात वाहताना
मी डोंगरी निर्झर झालो...
कड्याकपारीतून वाट काढीत
झुळूझुळू वाहत राहीलो !
जीवनाच्या प्रवाहात वाहताना
मी माझंच जीवन झालो
रोज रोज मरुन सुध्दा
आनंदाने जगत राहीलो !
---डॉ शिवाजी काळे.
Friday, 13 March 2015
जाऊ नको बाळा...दूरवरी
थकल्या जीवा
लावूनीया लळा
जाऊ नको बाळा
दूरवरी..
काळजीने तुझ्या
काळजात घर
परतुनी सत्वर
ये रे घरा..
आववांनी तव
उठले रे काहूर
काया ही थरथर
करीतसे..
अंगणात आपुल्या
भरली ही उदासी
सारे घर उपाशी
तुझ्याविना..
पापण्यात ओल्या
पाझरतसे माया
जीवनात रया
नाही आता..
सोन्याचा रे तुला
भरवीन घास
भलताच ध्यास
नको मना..
याचसाठी का रे
केला तुला मोठा
पोटाला चिमटा
घेऊनीया..
आईबाप तुझे
मूर्ती ममतेची
जाण ठेव तयांची
दूर जाता..
-- डॉ. शिवाजी काळे.
गर्वनिगर्व
उजाड बोडक्या
त्या माळावर
उभे बाभळीचे
झाड वेडे
वादळ अडवितो
म्हणता म्हणता
मुळासकट की
उखडून पडे !
संथ निळ्या
नदीचा काठ
हिरवी लव्हाळी
करती साजरा
वादळ आले
म्हणता म्हणता
माना तुकवून
करती मुजरा !
वळून पाहाते
वादळ द्वाड
लहरती लव्हाळी
विव्हळते झाड !
-- डॉ. शिवाजी काळे.