या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Sunday, 22 March 2015

प्रेम तू...

..... प्रेम  तू .....

यातना  सहन करत
आनंदी भाविष्याची वाट बघणाऱ्या
देवकीमातेचे, अव्यक्त  प्रेम तू......

हर्षाने  बाल-लिला  बघत
ब्रम्हांडाचे  दर्शन  घडालेल्या
यशोदेचे वात्सल्यरुपी  प्रेम तू......

इतिहासाची साक्ष असणाऱ्या
तव  दर्शनासाठी  आतुरलेल्या
गोप गोपिकांचे निरागस  प्रेम तू.....

स्वलहरींनी  सकल  आसमंत
नकळत मंञमुग्ध  करणाऱ्या
  वेणूचे  नादरूपी  प्रेम  तू.....

राव रंक  भेद  मिटवून
तव दर्शने तृप्त होणाऱ्या
सुदाम्याचे  मिञ रुपी  प्रेम तू.....

नियतीने क्रूर थट्टा मांडलेल्या
सहनशील  अन्  दृढनिश्चयी
पांचालीचे दृढ बंधू  प्रेम तू......

रणांगणावर शस्त्र टाकणाऱ्या
कुंतीपूञ महापराक्रमी  पार्थाचे
पथदर्शक  मिञ  प्रेम  तू.......

जगताला निखळ प्रेमाची
साक्ष  पटवून  देणाऱ्या
राधेचे  अमर  प्रेम  तू......

प्रेम  आणि  प्रेमच  तू......

--------डॉ माधुरी ------

Friday, 20 March 2015

तदात्मनः सृजाम्यहम् ?

कुरूक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगताना
तूच तर ग्वाही दिली होतीस ना
भारतवर्षाच्या रक्षणाची?
मग कुठे आहेस तू आता,
आणि कुठेय तुझा अवतार?
कि संपलास तुही यदुकुळाबरोबरच?
कि फक्त अंगठ्यातच होते तुझे प्राण?
दिसतेय का यादवी माजलेली तुला?
आणि शकुनींच्या कारवाया?
कंसाची मजल तर
गर्भापर्यंत गेलीय आता...!
पुतनामावश्या बहुराष्ट्रीय झाल्यात
आणि बाळकृष्णांना विष पाजतायत!
आजच्या द्रौपदींचा आवाज
पोहोचतोय का तुझ्यापर्यंत?
सोळा हजारजणींना आश्रय दिलास ना तू
मग आज हजारातल्या सोळा तरी
आहेत का सुरक्षित?
का सोडलीस रे कलीयुगाची साथ?
गल्लोगल्लीचे अर्जुन भटकतायत
मोडलेली धनुष्ये घेऊन!
कुठे  गेला  तुझा कर्मयोग आता ?
सुदामा एकटाच खातोय पोहे
खोलीच्या कोपऱ्यात बसून,
कालसर्पाच्या मस्तकावर
तू कधी नाचतोयस
याची वाट बघत!
आणि राधा तर काय
शोधतेय तुझा अंश
बुवाबापूंच्या आश्रमात !
तू स्वतःला विश्वरुप समजतोस ना?
भारताला ग्लानी आल्यावर
प्रकटणार होतास,
मग कशाची वाट पाहतोयस?
कि तेवढी ताकद नाही
तुझ्या करंगळीत आता
गोवर्धन उचलण्याएवढी.....?

                      ------- डॉ.शिवाजी काळे.

..........तू.........

..............तू............

मातेच्या गर्भातला श्वास
पित्याचा सार्थ आभिमान तू
बाहेरच्या अजाण जगाला
                   जाण, नवनवेली तू.....

अनेक दिशा समोर तुझ्या
वाट योग्य आंगिकार तू
अन् पंख प्रगतिचे लावून
               .   हो, नवचैतन्या तू......

सौंदर्य, बुद्धि अन् धैर्याचे
मूर्तिमंत उदाहरण तू
स्वसंरक्षणासाठी हो सिद्ध
                  शौर्या अन् सामर्थ्या तू....

ईश्वराची सर्वोत्कृष्ठ निर्मिती
वात्सल्याची साक्षात मूर्ति तू
अन्याया विरूद्ध पूकार लढा
       . .......... हो रणरागिनी तू...
               ... हो रणरागिनी तू......

            ________ डॉ. माधुरी .

Wednesday, 18 March 2015

आयुष्याचे गाणे

धगधगते बिंब बुडले रे पाण्यात
विरघळून जाई उजेड मग रात्रीत |
रे असेच असते दिवस रात्रीचे जाणे
सोबती आम्ही सारे, गातो आयुष्याचे गाणे ||

Tuesday, 17 March 2015

मन


       माणसाचं मन फार विचित्र असतं. कधीकधी मनाचंही कशातच मन लागत नाही. मग चंचल मन सुस्त पडतं, पंख छाटलेल्या गरुडासारखं....!
       मग उगाचच गतकाळाच्या पुस्तकाची पानं उलटत राहावंसं त्याला वाटतं. त्या पुस्तकाची अवस्था तर मनाहूनही विचित्र असते . त्याची पाने तरी कुठे सारखी असतात ? पुस्तक असूनही वेडंवाकडं....
      काही पानं अगदी स्वच्छ तर काही डागाळलेली.....कसल्यातरी पाण्यानं.....कडेनं मीठ फुटल्यासारखी! तर काही रंगीबेरंगी , पाहताच डोळ्यांत चमक आणणारी .काही कोरी करकरीत , तर काही फाटलेली , दुमडलेली, चुरगळलेली. काही पानं तर मुद्दामच एकमेकांना चिकटवून ठेवलेली ....थोडासा मजकूर चुकल्यासारखी . एखाद्या पानावरचा मजकूर सजवलेला...त्यावर चमक टाकलेली...उठून दिसावं म्हणून ..!
       पुस्तक पाहता पाहताच मनाचं मन थोडंसं हलकं होतं. त्याला पंख फुटू लागतात, उंच उंच उडावंसं वाटतं, ते पुस्तक फेकून द्यावंसं वाटतं ...
....पण मनाचे पंख फडफडताच पुस्तकाची पानंही फडफडतात. मनाचा पिच्छा ते पुस्तक काही सोडत नाही.
     मग मन त्या पुस्तकाला बरोबरच घेऊन फिरतं. त्याला सजवण्याचा, सुंदर करण्याचा प्रयत्न करतं. पण पुस्तकाची पानं मात्र रोज वाढतच असतात . त्यामुळे मनाचा भार हलका होण्याऐवजी वाढतच जातो. तो भार सांभाळता सांभाळता मन थकतं, दमून जातं...
        मग तो भार हलका करण्यासाठी ते दुसऱ्या एखाद्या मनाला मदत मागतं. यामुळे काही मनांचा भार हलका होतोही ......पण.......कधीकधी त्या दुसऱ्या मनाचाच भार पेलण्याची पाळी येते ...
........मग मात्र मन हताश होतं. त्याला त्या पुस्तकाचा राग येतो......ते दूर निघून जातं.....एखाद्या हलक्या मनापाशी....जेथे पानांची फडाफड अजीबात ऐकू येणार नाही अशा ठिकाणी ....!!!
        --------------------डॉ. शिवाजी काळे.

Monday, 16 March 2015

फुले आणि शशी



चंद्र तो नभीचा
मुखचंद्र हा धरेचा
लपतात का दोन्ही
प्रीत माझी पाहुनी

आस जीवा निरंतन
त्यासवे स्वप्नरंजन
नितनवी कला दाविती
दोही खट्याळ कलावती

रूप अशेष हे तयांचे
लावण्य खुलवी पौर्णिमेचे
वळवळुनी त्यांसी देखिता
उन्मादती रुपगर्विता 
   
     -संध्या §


Saturday, 14 March 2015

जीवनप्रवाह

जीवनाच्या प्रवाहात वाहताना
        मी पिंपळपान झालो...
पाण्यामधे कुजून कुजून
        जाळीदार नक्षी झालो !

जीवनाच्या प्रवाहात वाहताना
        मी एक ओंडका झालो...
लाटांना धडका देत देत
        निरंतर तरंगत राहीलो !

जीवनाच्या प्रवाहात वाहताना
        मी उग्र प्रपात झालो...
खडकावर आदळून आपटून
        शांत शांत नदी झालो !

जीवनाच्या प्रवाहात वाहताना
        मी डोंगरी निर्झर झालो...
कड्याकपारीतून वाट काढीत
        झुळूझुळू वाहत राहीलो !

जीवनाच्या प्रवाहात वाहताना
        मी माझंच जीवन झालो
रोज रोज मरुन सुध्दा
         आनंदाने जगत राहीलो !

               ---डॉ शिवाजी काळे.