या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Tuesday, 22 March 2016

सुरुवातीचे दिवस

बेबंदाला बेधुंदीची जोड मिळाली होती
पायबंदी कोड्याचीही फोड कळाली होती
मस्तमौला बेफिकीर सुरावटीचे दिवस
खूपच होते निर्ढावलेले सुरवातीचे दिवस

अधांतरी अंतर्मनी हेलकावे हिंदोळ्याचे
उचंबळ लोळाचा दमनशमन कल्लोळाचे
डोळ्यांमधे जागणा-या सांजवातीचे दिवस
खूपच होते गंधाळलेले सुरुवातीचे दिवस

डोळे झाकून रोज चाले विस्तवाशी खेळ
बसत नव्हता स्वप्नांचाही वास्तवाशी मेळ
समई समजून निरंजनी फुलवातीचे दिवस
खूपच होते वेडावलेले सुरुवातीचे दिवस

आनंदाच्या फांदीवरती टांगून गेले झुला
मुग्धतेचा अर्थ खरा सांगून गेले मला
ऊर्मी गुर्मी रोज नव्या रुजवातीचे दिवस
खूपच होते लाडावलेले सुरुवातीचे दिवस

ओथंबलेल्या घनांना अडविल का कोणी
हुंदके त्यांचे अडकलेले सोडविल का कोणी
साचेबंदी नाकेबंदी आले वहीवाटीचे दिवस
फिरुन पुन्हा येतील का सुरुवातीचे दिवस ?

      ....डॉ. शिवाजी काळे.

प्रीत

तुझी माझी प्रीत सखे
मातीतली ओल गं
उजाड या रानामध्ये
पाणी खोल खोल गं

वैशाखाच्या वणव्याने
वन सारे पेटले
आसवांच्या सावलीत
जीव वेडे भेटले
प्रीतीचे हे मूळ रुजे
आणि खोल खोल गं

मेघ सारे एक झाले
विझवाया आग ही
वळीवाच्या पावसाला
कशी आली जाग ही
थरथरे मन सये
अक्ष हे अबोल गं

कार्तिकाच्या आगमने
हवा झाली गारट
मोहरली काया माझी
वांच्छा झाली सैराट
कवेमधी येई  प्रिये
काळजाशी बोल गं ..

तुझी माझी प्रीत सखे
मातीतली ओल गं....
मातीतली ओल गं ...
            डॉ संध्या राम शेलार .